छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर नव्हते तर स्वराज्यरक्षक होते, असं विधान केल्याने अजित पवार यांच्याविरोधात भाजपा आणि शिंदे गटाचे कार्यकर्ते आंदोलन करत आहेत. त्यातच औरंगजेब क्रूर असता, तर विष्णूचं मंदिरही तोडलं असतं ना? असं वक्तव्य राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलं होतं. यावरून भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी जितेंद्र आव्हाड यांना पत्र लिहित, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांना लक्ष्य केलं आहे.

नितेश राणे ट्वीट करत म्हणाले, “आपण औरंगजेबाबाबत ‘औरंजगजेब क्रूर असता तर विष्णूचं मंदिरही तोडलं असता ना?’ असं केलेलं वक्तव्य स्वाभाविकच आहे. कारण आपले सर्वस्व यांची श्रद्धा औरंगजेबावर आहे, हे केव्हाच सिद्ध झालं आहे! कारण त्यांनी तहआयुष्यात कधीही आमच्या हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीवर एकदाही नतमस्तक केलं नाही किंवा रायगडाच्या दिशेने त्यांचे कधी पाय वळाले नाही,” असं म्हणत नितेश राणेंनी शरद पवारांवर टीका केली.

हेही वाचा : “भाजपाने मला विरोधीपक्षनेते पद दिलं नाही, त्यामुळे…” राजीनाम्याच्या मागणीवर अजित पवार संतापले!

“असल्या लोकांच्या नादी…”

यावर आता विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी भाष्य केलं आहे. “टिल्ल्या लोकांनी हे सांगण्याची गरज नाही. त्यांची उंची आणि झेप किती, त्यांना मी कशाला उत्तर देऊ. माझे प्रवक्ते त्यांना उत्तर देतील. असल्या लोकांच्या नादी लागत नसतो,” असं प्रत्युत्तर अजित पवारांनी दिलं आहे.

हेही वाचा : “छत्रपती संभाजीराजेंना स्वराज्य रक्षक म्हणावं हीच माझी भूमिका पण धर्मवीर…” अजित पवार नेमकं काय म्हणाले?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“संभाजी महाराजांबद्दल काही चुकीचं…”

गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या वादावर अजित पवारांनी प्रसारामाध्यमांशी संवाद साधत स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला. अजित पवार म्हणाले, “छत्रपती संभाजी महाराजांबाबत सभागृहात केलेल्या विधानावर ठाम आहे. छत्रपती संभाजी महाराजांनी स्वराज्याचं रक्षण केलं. त्यामुळे संभाजी महाराजांना स्वराज्यरक्षक म्हणणेच न्याय देणार आहे. संभाजी महाराजांबद्दल काही चुकीचं बोललो, असं मला वाटत नाही. मी माझी भूमिका मांडली, ज्यांना योग्य वाटेल त्यांनी स्वीकारावी,” असं अजित पवारांनी स्पष्ट केलं.