Ajit Pawar on Maharashtra Tourists Stucked in Nepal : नेपाळमधील ‘जेन झी’ तरुण रस्त्यावर उतरले आहेत. हे तरुण गेल्या तीन दिवसांपासून सरकारविरोधात हिंसक आंदोलनं करत आहेत. या आंदोलनामुळे नेपाळच्या पंतप्रधानांसह अनेक मंत्र्यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. देशभर हिंसक आंदोलनं चालू असून आंदोलकांनी तिथली संसद, उच्च न्यायालय व अनेक मंत्र्यांचे बंगले पेटवले आहेत. नेपाळमध्ये अस्थिर वातावरण निर्माण झालेलं असताना हजारो भारतीय पर्यटक तिथे अडकले आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील १०० ते १५० पर्यटकांचा समावेश आहे.
दरम्यान, नेपाळमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांना परत आणण्यासाठी राज्य सरकार युद्धपातळीवर प्रयत्न करत असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. अजित पवार यांनी यासंदर्भात एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट केली आहे. यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की “महाष्ट्रातील पर्यटकांना परत आणण्यासाठी आम्ही सर्व प्रकारचे प्रयत्न करत आहोत. तिथे अडकलेल्या कुटुंबांना आपलं सरकार पूर्ण मदत करेल.”
काय म्हणाले अजित पवार?
अजित पवार म्हणाले, “नेपाळमधील राजकीय अस्थिरता आणि त्यामुळे निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर तिथं अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांना सुखरुप परत आणण्यासाठी राज्य सरकार युध्दपातळीवर प्रयत्न करत आहे. केंद्रीय परराष्ट्र व्यवहार मंत्रालय तसंच महाराष्ट्र सदन यांच्या माध्यमातून राज्य शासन नेपाळमधील भारतीय दुतावासाच्या संपर्कात असून राज्यातील पर्यटकांना आवश्यक ती मदत पुरवण्याचे प्रयत्न करत आहे. नेपाळमध्ये अडकलेल्या प्रत्येक पर्यटकाला सुरक्षितपणे घरी परत आणणं आणि त्यांच्या कुटुंबांना दिलासा देणं हीच प्राथमिकता आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील पर्यटकांनी घाबरुन जाऊ नये, असं आवाहन आहे.”
राज्य सरकार पर्यटकांच्या संपर्कात : उपमुख्यमंत्री
“राज्यातील ठाणे, पुणे, मुंबई, लातूर, कोल्हापूर जिल्ह्यातील सुमारे १०० पर्यटक नेपाळमध्ये अडकले असल्याची माहिती आतापर्यंत प्राप्त झाली आहे. त्याव्यतिरिक्त बीड जिल्ह्यातून गेलेले पर्यटक रस्ता मार्गे खासगी वाहनानं परत यायला निघालेले असून ते उत्तर प्रदेशात गोरखपूरपर्यंत पोहोचले आहेत. सर्वाधिक पर्यटक ठाणे जिल्ह्यातील मुरबाड येथील आहेत. सर्व पर्यटक सुरक्षित आहेत. अडकलेल्या पर्यटकांना आवश्यक ती मदत करण्यासाठी राज्य शासन तत्पर असून त्यांच्याशी संपर्क साधून आहे.”
नेपाळमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांमध्ये ठाण्यातील ६० हून अधिक, पुणे ५, मुंबई ६, अकोला १०, यवतमाळ १, लातूर २, कोल्हापूर जिल्ह्यातील एकाचा समावेश आहे. उर्वरित पर्यटक कुठल्याही जिल्ह्यातील आहेत याबाबतची माहिती अद्याप मिळालेली नाही. राज्यातील पर्यटक सहा वेगवेगळ्या टूर ऑपेटरच्या माध्यमातून नेपाळमध्ये पर्यटनाला गेले होते.