राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दोन्ही गटांमधील नेते एकमेकांवर सतत आरोप प्रत्यारोप करत असतात. पक्षात बंडखोरी झाल्यापासून बंडखोर नेत्यांनी अनेकदा पक्षातील अंतर्गत घटनांबाबत गौप्यस्फोट केले आहेत. बंडखोर आमदारांच्या गटाचे प्रमुख आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज नवा गौप्यस्फोट केला आहे. अजित पवार गटाने आज कोल्हापुरात जाहीर सभेचं आयोजन केलं होतं. या सभेला संबोधित करताना अजित पवार यांनी गेल्या वर्षी (२०२२) महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात काय घडत होतं याबाबत माहिती दिली आहे.

अजित पवार म्हणाले, बरेच जण आमची बदनामी करतात. आम्ही महायुतीत सामील झालो म्हणून टीका टिप्पणी करतात. आमच्यावर दबाव होता म्हणून आम्ही सत्तेत सामील झालो अशी टीका करतात. परंतु, आमच्यावर लोकांची कामं करण्याचा दबाव होता म्हणून आम्ही सत्तेत सामील झालो आहोत. संधी मिळाल्यावर लोकांची कामं केली पाहिजेत. लोककल्याणकारी योजना शेवटच्या माणसापर्यंत आपण राबवल्या पाहिजेत. लोकहिताला प्राधान्य देणं हाच आमचा मार्ग. त्यासाठी आम्ही महायुतीत सामील झालो आहोत. परंतु, काहीजण आमची बदनामी करत असतात.

अजित पवार म्हणाले. मित्रांनो, मी आज महाराष्ट्राला एक गोष्ट सांगतो. खरंतर उद्धव ठाकरे यांचं सरकार ज्या दिवशी पडत होतं, त्याच वेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्वच्या सर्व आमदारांनी, एखाद दुसरा आमदार राहिला असेल, परंतु सर्वच्या सर्व आमदार आणि मंत्र्यांनी एक पत्र तयार केलं आणि ते पत्र नेत्यांना दिलं. या पत्रात म्हटलं होतं की महायुतीत सामील व्हा. हे खोटं असेल तर मी राजकारणातून निवृत्त होईन. कुणाची तयारी आहे का? आणि हे खरं असलं तर मग जे लोक खोटं बोलतात त्यांनी राजकारणातून निवृत्त झालं पाहिजे. आहे का त्यांची तयारी?

हे ही वाचा >> “सरकारला निजामाचे पुरावे चालतात, पण छत्रपतींचे नाही”, काँग्रेसच्या टीकेला अजित पवारांचं उत्तर, म्हणाले…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अजित पवार म्हणाले, या कोल्हापुरात सर्व जाती धर्माचे लोक राहतात. अशा शहरात कोणी जातीय, धार्मिक सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न केला तर आम्ही सरकारमध्ये असतानाही तो हाणून पाडू हे वचन मी या जाहीर सभेतून कोल्हापूरकरांना देतोय. कोल्हापूरकरांचा विचारांचा वारसा, फुले-शाहू-आंबेडकरांच्या विचारांचा वारसा आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून पुढे नेऊ.