अहमदनगरच्या फकीरवाडा भागात रविवारी (०३ जून) संदल उरुसच्या मिरवणुकीत मुघल बादशाह औरंगजेबाच्या प्रतिमेचे फलक झळकावत काही तरुणांनी नाच केला. तसेच या मिरवणुकीत त्यांनी घोषणाबाजी केल्याचाही आरोप केला जात आहे. याप्रकरणी भिंगार कँप पोलिसांनी चार जणांवर गुन्हा दाखल केला आहे. या घटनेवरून राज्यातलं वातावरण तापू लागलं आहे. यावर राजकीय प्रतिक्रियादेखील येत आहेत. अशातच काही वेळापूर्वी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांना प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना प्रश्न विचारला की, महाराष्ट्रात औरंगजेबाचं समर्थन केलं जातंय का? त्यावर अजित पवार म्हणाले, औरंगजेबाचं समर्थन करण्याचं काहीच कारण नाही.

अजित पवार म्हणाले, या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात औरंगजेबाचं समर्थन कसं कोणी करेल आणि ते का करावं? उगीचच त्या घटनेला वेगळं स्वरूप देऊ नका. अफझल खान असेल किंवा औरंगजेब असेल या लोकांचं समर्थन करण्याचं काहीच कारण नाही. कोणीही त्यांचं समर्थन करणार नाही. अशा प्रकारच्या बातम्या पसरवून लोकांमध्ये गैरसमज निर्माण करण्याचं काम कोणी करत असेल, समाजात एकमेंकांबद्दल अडी निर्णाण करण्याचं किंवा तेढ निर्माण करण्याचं काम कोणी करत असेल तर त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे.

अजित पवार म्हणाले, आपण राज्यात जातीय सलोखा टिकवला पाहिजे. पिढ्यान पिढ्या आपण सगळेजण गुण्या गोविंदाने एकत्र राहतोय. त्याला कुठलाही डाग लागता कामा नये.

हे ही वाचा >> VIDEO : भाषणादरम्यान अरविंद केजरीवाल यांना अश्रू अनावर; रडत म्हणाले, “आम्हाला मनीष सिसोदियांचं…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

औरंग्याचं नाव घेणाऱ्याला माफी नाही : फडणवीस

या घटनेवर मंगळवारी (०७ जून) संध्याकाळी उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील प्रतिक्रिया दिली. फडणवीस म्हणाले, “औरंगजेबाचे फोटो जर कुणी झळकवत असेल, तर हे इथे सहन केलं जाणार नाही. या देशात, महाराष्ट्रात आमचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजच असू शकतात. कुणी औरंग्याचं नाव घेत असेल, तर त्याला माफी नाही”,