राज्य सरकारने द्राक्षे बागायतदार तसेच वाइन उद्योगास चालना मिळावी, यासाठी मोठी किराणा दुकाने अथवा सुपरमार्केट तसेच ‘वॉक इन स्टोअर’मध्ये वाइनविक्रीस परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. मंत्रिमंडळाने त्यावर शिक्कामोर्तब केले आहे. हा निर्णय राज्य सरकारने घेतल्यानंतर त्यावरून सत्ताधारी विरुद्ध विरोधक असा वाद सुरू झाला आहे. भाजपानं या मुद्द्यावरून राज्य सरकारला लक्ष्य करायला सुरुवात केली असताना आता राज्य सरकारकडून देखील जोरकसपणे बाजू मांडली जात आहे. असं असतानाच आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील वाईन विक्रीच्या मुद्द्यावरुन सरकारची पाठराखण करताना अनेक देशांमध्ये पाण्याऐवजी वाईन प्यायली जाते असं म्हटलंय.

अजित पवार नक्की काय म्हणाले?
पुण्यात करोना परिस्थितीच्या आढावा बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत अजित पवार यांनी वाइनसंदर्भातील राज्य सरकारच्या निर्णयाला होणाऱ्या विरोधावरुन विरोधकांना टोला लगावला आहे. वाइनवरुन झालेल्या वादासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला असता अजित पवारांनी सविस्तरपणे आपली भूमिका मांडली. “वाइन आणि दारू यात जमीन-आस्मानाचा फरक आहे. आपल्या राज्यातले अनेक शेतकरी वेगवेगळ्या प्रकारची फळं तयार करतात. द्राक्ष, काजूपासून वाइन तयार होते. अशी अनेक फळं आहेत. आपल्याकडे वाइन पिणाऱ्यांचं प्रमाण अतिशय अल्प आहे. जेवढी वाइन तयार होते, तेवढी आपल्या राज्यात खपत नाही. इतर राज्यांत आणि काही परदेशात निर्यात होते,” असं अजित पवार यांनी वाइनच्या व्यवसायासंदर्भात माहिती देताना सांगितलं.

नक्की वाचा >> लोकसत्ता विश्लेषण : वाइनविक्री आता सुपरमार्केटमध्येही; धोरण काय? आव्हाने कोणती?

काही देश पाण्याऐवजी वाइन…
पुढे बोलताना, “काही देश पाण्याऐवजी वाइन पितात हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पण काहींनी जाणीवपूर्वक मद्य राष्ट्र वगैरे म्हणून त्याला महत्त्व दिलं आहे”, असं अजित पवार म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न
“आम्ही सरकारमध्ये काम करत असताना जनतेचं नुकसान होईल वगैरे असं काही करणार नाही. मध्य प्रदेशनं घरपोच दारू पोहोचवण्याचे निर्णय घेतले आहेत. त्यांचं त्यांना लखलाभ. आपण निर्णय घेताना त्यात दारू नाही, तर वाईन विक्रीसाठी परवानगी दिली आहे. मात्र काही लोकांनी व्हिडीओ क्लिप वगैरे काढून सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न, सरकारबाबत लोकांच्या मनात गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे”, असं देखील अजित पवार म्हणाले.