अजित पवारांनी त्यांच्या अधिकृत एक्स अकाऊंटवर एक व्हिडीओ आज सकाळी शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये त्यांनी अर्थसंकल्पातील महत्त्वाच्या तरतुदी, विरोधकांकडून करण्यात येणारी टीका आणि त्यांच्यावर मध्यंतरीच्या काळात करण्यात आलेले भ्रष्टाचाराचे आरोप यासंदर्भात सविस्तर भूमिका मांडली आहे. तसेच, आपण विकासावर काम करतो, म्हणून विरोधकांच्या पोटात कळा यायला लागल्या आहेत, असंही अजित पवार या व्हिडीओमध्ये म्हणाले आहेत. यावेळी त्यांनी भ्रष्टाचाराच्या आरोपांबाबत केलेल्या विधानामुळे तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे.

“मी आजपर्यंत एकही पक्ष बदललेला नाही”

“राजकारणात आल्यापासून मी कोणताही पक्ष बदललेला नाही. पहिल्या दिवसापासून राज्याची जनता हाच माझा पक्ष राहिलेला आहे. मी पूर्वीही जनतेचाच होतो, आजही जनतेचाच आहे”, असं अजित पवार या व्हिडीओमध्ये म्हणाले. “मी जे काही करतो, त्यात जनतेच्या हिताचाचा विचार करतो. विकासाच्या चाकाला अधिक गती कशी देता येईल याचाच विचार माझ्या डोक्यात चालू असतो. त्याच विचारातून हा अर्थसंकल्प बनवला आहे. त्यामुळे जे लोक अर्थसंकल्पावर नाकं मुरडत आहेत, त्यांचे चेहरे नीट बघून ठेवा. ही तीच लोकं आहे ज्यांना तुमच्या दारी विकासाची गंगा पोहोचू द्यायची नाही, सरकारी योजनांच्या लाभापासून तुम्हाला दूर ठेवायचं आहे”, असं म्हणत त्यांनी विरोधकांना लक्ष्य केलं आहे.

“माझा दोष फक्त इतकाच आहे की…”, अजित पवारांनी जारी केला Video संदेश; म्हणाले, “त्यांनी मला शिव्या द्यायचं ठरवलंय”!

“…तेव्हा हे सगळे झोपले होते का?”

“काहीजण अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी पुरेशी तरतूद नसल्याची तक्रार करत आहेत. मी अर्थसंकल्प सादर करत होतो, तेव्हा हे लोक झोपलेले होते का? आम्ही दूध उत्पादकांसाठी प्रतिलिटर ५ रुपये अनुदान जाहीर केलं. या लोकांना त्याची खबरबातही नाही. विरोधकांचं राज्याच्या विकासाशी देणं-घेणं नाहीये. त्यांना फक्त राजकारण करायचं आहे. आम्ही गावखेड्यातल्या लोकांसाठी योजना दिल्या. पण त्यांच्या पोटात दुखायला लागलं आहे”, असं अजित पवार म्हणाले.

“विधानसभा निवडणुकीसाठी आमचा विकास हाच एक मुद्दा आहे. तुम्हाला विरोधकांकडून फूस लावण्याचा प्रयत्न केला जाईल. पण तुम्ही अशा घाणेरड्या राजकारणात अडकू नका. तुम्ही भाषणबाजी करणाऱ्या नेत्यांपासून जपून आणि दूर राहा. काम करणाऱ्या नेत्यांच्या पाठीशी राहा, त्यांनाच मतदान करा”, असं आवाहन अजित पवारांनी राज्यातील जनतेला केलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“माझी कामं ज्यांना आठवत नसतील, त्यांनी…”

“माझ्या कामांची यादी खूप मोठी आहे. ज्यांना आठवत नसेल त्यांनी माहिती घ्यावी की या सर्व विकासकामांची सुरुवात कुणी केली. या सगळ्यात तुम्हाला तुमच्या दादाचा बघायला मिळेल याची मला खात्री आहे. राजकारणात जो जास्त काम करतो त्याला थोडा जास्तच विरोध सहन करावा लागतो. म्हणूनच माझ्यावर मधल्या काळात भ्रष्टाचाराचे खोटे आरोप करण्यात आले. माझ्यावरच्या भ्रष्टाचाराचा एकही आरोप आरोप आजपर्यंत सिद्ध झालेला नाही, ना भविष्यात होईल”, असा ठाम विश्वास अजित पवारांनी व्यक्त केला आहे.