Ajit Pawar on Latur Incident: रविवारी लातूरमध्ये घडलेल्या प्रकारावरून सध्या राजकीय वर्तुळात मोठी चर्चा पाहायला मिळत आहे. एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते व पदाधिकारी आक्रमक झाल्याचं दिसून आल्यानंतर दुसरीकडे छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनीदेखील तीव्र निषेध सुरू केला आहे. महाराष्ट्रात काही ठिकाणी संघटनेच्या वतीने आंदोलनेही करण्यात आली. लातूरमधील घटनेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार चांगलेच संतप्त झाले असून सूरज चव्हाण यांना थेट राजीनामा देण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत.
अजित पवारांची X पोस्ट!
अजित पवारांनी यासंदर्भात आपल्या अधिकृत एक्स हँडलवर पोस्ट शेअर केली असून त्यात आपली बूमिका स्पष्ट केली आहे. “काल लातूरमध्ये घडलेल्या अत्यंत गंभीर आणि निषेधार्ह घटनेच्या पार्श्वभूमीवर, मी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांना त्यांच्या पदाचा त्वरित राजीनामा द्यायच्या स्पष्ट सूचना दिल्या आहेत”, अशी माहिती अजित पवारांनी या पोस्टमध्ये दिली आहे.
दरम्यान, “पक्षाच्या मूल्यांच्या विरोधात जाऊन केले जाणारे वर्तन कोणत्याही स्थितीत स्वीकारले जाणार नाही, यासाठी हा कठोर निर्णय घेतला आहे”, अशा शब्दांत अजित पवारांनी गैरवर्तन करणाऱ्या कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना दम दिला आहे.
सूरज चव्हाण यांचा राजीनामा
दरम्यान, ज्या सुनील तटकरेंच्या समोर हा सगळा गोंधळ झाला, त्यांनीच सूरज चव्हाण यांनी राजीनामा दिल्याची माहिती दिली आहे. सोमवारी दुपारी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. “सूरज चव्हाण यांच्याबाबत पक्षाने निर्णय घेतला आहे. रविवारी झालेल्या प्रकरानंतर पक्षाच्या अध्यक्षांनी त्यांना सांगितलं की तुम्ही राजीनामा द्यावा. ज्यानंतर महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेस युवा प्रदेशाध्यक्ष पदाचा सूरज चव्हाण यांनी राजीनामा दिला आहे”, असं ते म्हणाले.
लातूरमध्ये नेमकं काय घडलं?
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसकडून स्थानिक परिस्थितीचा आढावा घेतला जात आहे. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे याचसंदर्भात लातूर दौऱ्यावर असताना छावा संघटनेचे कार्यकर्ते त्यांना भेटायला आले. कृषीमंत्री माणिकराव कोकाटे विधानसभे मोबाईलवर पत्ते खेळत असल्याचे फोटो व व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्यावरून टीका होत आहे. याचा निषेध म्हणून संघटनेच्या कार्यकर्त्यांनी तटकरेंना निवेदन दिलं. पण त्याचवेळी तिथे त्यांनी पत्तेदेखील उधळले.
याचाच राग आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण करायला सुरुवात केली. हा सगळा गोंधळ सुनील तटकरेंच्या समोरच घडला. या घटनेवर विरोधकांनी तीव्र शब्दांत टीका सुरू केली असून एकीकडे कृषीमंत्री मोबाईलवर पत्ते खेळत आहेत तर दुसरीकडे उपमुख्यमंत्र्यांच्या पक्षातील पदाधिकारी-कार्यकर्ते मारहाण करत आहेत, अशा प्रतिक्रिया उमटू लागल्या. या पार्श्वभूमीवर अखेर अजित पवारांनी भूमिका स्पष्ट केली आहे.