सोन्याचे दागिने घालणं हे स्त्रियांनाच शोभून दिसते. पुरुषांनी उगीच त्या भानगडीत पडू नये. अन्यथा गळ्यात सोन्याच्या जाडजूड साखळ्या घालणारे पुरुष गळ्यात साखळी घातलेल्या बैलांसारखे दिसतात, असे वक्तव्य अजित पवार यांनी केले. ते सोमवारी चाकण येथील रांका ज्वेलर्सच्या दालनाच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. यावेळी त्यांनी गोल्डनमॅन म्हणून मिरवणाऱ्या आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या दिल्या.

काय म्हणाले अजित पवार?

लहानातल्या लहान माणसांपासून अनेक लोकांना सोनं आणि सोन्याचे दागिने वापरणं आवडतं. एकंदरीतच लोकांचं राहणीमान बदलतं आहे. पर्चेसिंग पावर वाढली आहे. त्यामुळे अनेकजण सोन्याच्या ज्वेलर्समध्ये जाऊन चांगलं सोनं खरेदी करतात. एखादा प्रसंग आलाच तर सोनं गहाणही ठेवता येतं. वेळेला त्याचे पैसेही करता येतात. आपल्याकडे गोल्डन मॅन म्हणूनही काहींची ओळख आहे. कुणीतरी तर सोन्याचे कपडेही शिवले होते हे आपण पाहिलं. पण ते सगळं अति होतं. मला या सगळ्यांना सांगायचं आहे की सोनं हे आपल्या आईच्या, पत्नीच्या, लाडक्या बहिणीच्या किंवा मुलीच्या अंगावर शोभून दिसतं. पुरुषांच्या अंगावर एवढं सोनं काही शोभून दिसत नाही त्यामुळे उगीचच त्या भानगडीत पडू नका. आपण त्या बैलाला साखळी घालतो तशा साखळ्या घालतात आणि येतात समोर. जे कुणी अशा साखळ्या घालतात ते त्यांच्या पैशांनी घालतात. मला काही त्यांच्याबाबत बोलण्याचा अधिकार नाही पण ते सोनं त्यांनी त्यांच्या घरातल्या स्त्रियांना दिलं तर जास्त चांगलं होईल.

अजित पवारांकडून पूरग्रस्तांच्या मदतीविषयी भाष्य, म्हणाले…

सर्व मंत्र्यांनी दौरे केलेत. शेतकऱ्यांचा रोष, नाराजी, राग, विरोध पाहायला मिळाला. जेव्हा घरदार उध्वस्त होतं, शेतीचं प्रचंड नुकसान होतं, जमीन वाहून जाते, तेव्हा साहजिक अशा प्रतिक्रिया उमटतात. पण आम्ही या शेतकऱ्यांना कशी मदत करता येईल, त्या अनुषंगाने निर्णय घ्यायचं ठरवलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीचा दौरा केला. पंतप्रधान नरेंद्र मोदींना झालेल्या नुकसानीची माहिती दिली आहे. शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत मिळावी अशी मागणी केलेली आहे. यासाठी विविध विभागांची मदत लागणार आहे. सरकार याबाबत उद्याच्या बैठकीत निर्णय घेईल, असे अजित पवार यांनी पिंपरी-चिंचवड येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.

मुख्यमंत्री आणि सरकार म्हणून आम्ही सांगितलं आहे. शेतकऱ्यांना असं काही द्यावं लागणार आहे, जेणेकरून सरकार त्यांच्या पाठीशी आहे, असं वाटायला हवं. दिवाळीपर्यंत बळीराजाला या संकटातून बाहेर काढण्याचे नियोजन आहे. आत्ता तातडीची ५ हजार रुपये, अन्न-धान्य, कपडे, निवारा अशी मदत केली जात आहे, असे अजित पवार यांनी स्पष्ट केले.