एक वर्षापूर्वी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी बंडखोरी केली होती. त्यानंतर आज राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या काही आमदारांनी बंडखोरी केली आहे. अजित पवार आता शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले आहेत. त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथही घेतली आहे. पण जेव्हा शिंदे गटाने बंडखोरी केली, तेव्हा अजित पवार निधी देत नाहीत, म्हणून आम्ही बंडखोरी केली असा दावा शिंदे गटाने केला होता.

अजित पवारांच्या जाचामुळेच आम्ही महाविकास आघाडीतून बाहेर पडलो, असं वक्तव्य शिंदे गटाच्या विविध नेत्यांनी केलं होतं. आता अजित पवार हेच युती सरकारमध्ये सामील झाले आहेत. त्यामुळे निधी न देणारे अजित पवार युतीत कसे? असा सवाल विचारला जात आहे. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वत: उत्तर दिलं आहे.

हेही वाचा- शरद पवार की अजित पवार? जयंत पाटलांनी दोन शब्दांत मांडली भूमिका, म्हणाले…

अजित पवार निधी देत नव्हते म्हणून बंड केलं. आता तेच युतीत कसे काय? असा सवाल विचारला असता एकनाथ शिंदे यांनी अगदी थोडक्यात उत्तर दिलं. ते म्हणाले, “आता मी मुख्यमंत्री आहे. त्यामुळे कुठलीही तक्रार राहणार नाही.” मीरा भाईंदर येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी हे विधान केलं आहे.

हेही वाचा- अजित पवारांच्या बंडखोरीवर सुप्रिया सुळेंची एका शब्दात प्रतिक्रिया; शरद पवारांचा VIDEO ट्वीट करत म्हणाल्या…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आज सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही आमदारांनी शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिला आहे. पाठिंबा जाहीर केल्यानंतर काही वेळातच अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या इतरही काही नेत्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. शपथ घेणाऱ्या नेत्यांमध्ये राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, धनंजय मुंडे, सुनील तटकरे यांच्यासह इतरही नेत्यांचा समावेश आहे.