Ajit Pawar Wishesh Devendra Fadnavis : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आज ५५ वा वाढदिवस आहे. या वाढदिवसानिमित्त एका विशेष पुस्तकाचं (कॉफी टेबल बूक) प्रकाशन करण्यात आलं आहे. या पुस्तकात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एक लेख लिहून फडणवीस यांचं कौतुक केलं आहे. ‘मैत्री जपणारं नेतृत्व’ या शीर्षकासह अजित पवार यांनी त्यांचा लेख प्रसिद्ध केला आहे. तसेच फडणवीस ज्या मुख्यमंत्रिपदावर आज बसलेत ती खुर्ची त्यांनी स्वकर्तृत्वाने मिळवली असल्याचं म्हटलं आहे.
अजित पवार यांनी म्हटलं आहे की महाराष्ट्रासारख्या प्रगत, पुरोगामी, सुसंस्कृत राज्याचं मुख्यमंत्रिपद हे देशाच्या पंतप्रधान पदानंतरचं दुसरं महत्त्वाचं पद मानलं जातं. इतक्या महत्वाच्या पदावर काम करण्याची संधी मिळणं आणि मिळालेल्या संधीचं सोनं करणं, या दोन्ही किमया विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लीलया पेलून दाखवल्या आहेत. यामागे त्यांचं संघटनकौशल्य, पक्षनिष्ठा, नेतृत्वावरील श्रद्धा, अभ्यासू वृत्ती, दूरदृष्टी, विकासाचा ध्यास आणि प्रचंड परिश्रम घेण्याची तयारी हे गुण प्रामुख्याने दिसतात.
उपमुख्यमंत्री म्हणाले, “महाराष्ट्र सुरुवातीपासून प्रगत, पुरोगामी, सुधारणावादी विचारांचं राज्य आहे. राज्याला अभ्यासू, दूरदृष्टीच्या, कर्तृत्ववान नेतृत्वाची, मुख्यमंत्र्यांची गौरवशाली परंपरा लाभली आहे. आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार, राज्याचे पहिले मुख्यमंत्री दिवंगत यशवंतराव चव्हाण यांनी राज्यात पायाभूत प्रकल्पांची, शैक्षणिक, सहकारी, वैज्ञानिक, संशोधनात्मक संस्थांची उभारणी करुन राज्याच्या सर्वांगीण प्रगतीचा पाया भक्कम केला. शेती, उद्योग, व्यापार, सहकार, बँकिंग क्षेत्राला प्रोत्साहन देऊन आर्थिक प्रगतीचा वेग वाढवला.
“फडणवीसांची साथ देताना आनंद होतोय “
“महाराष्ट्राला आतापर्यंत लाभलेल्या सर्व मुख्यमंत्र्यांनी राज्याचा प्रगत, पुरोगामी, सुधारणावादी विचार जपला. त्यांच्या प्रयत्नांमुळेच महाराष्ट्र देशात अव्वलस्थानी राहिला. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा हाच गौरवशाली वारसा देवेंद्र फडणवीस यांनी यशस्वीपणे पुढे नेत आहे. फडणवीस हे दूरदृष्टीच्या निर्णयांतून, नियोजनबद्ध योजनांतून, सातत्यपूर्ण प्रयत्नांतून समाजातील सर्व घटकांचा, सर्वांगीण, सर्वसमावेशक विकास साधत आहेत. त्यांच्या प्रयत्नांना साथ आणि सहकार्याचं बळ देताना राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून मला मनस्वी आनंद आहे.
अन् अवघ्या २२ व्या वर्षी फडणवीस नागपूर महापालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आले : अजित पवार
“देवेंद्र फडणवीस नावाशी माझी पहिली ओळख नव्वदच्या दशकात झाली. नंतरच्या तीन दशकांमध्ये ती अधिक ठळक होत गेली. गेल्या ३५ वर्षांच्या माझ्या राजकीय वाटचालीत कधी विरोधी पक्षाचे नेते, कधी राज्याचे मुख्यमंत्री, कधी उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांशी सातत्याने संपर्क, संवाद, समन्वय वाढतच राहिला. त्यातून त्यांच्या व्यक्तिमत्वाचे अनेक गुण, पैलू कळत गेले. फडणवीसांना राजकारणाचं बाळकडू घरातूनच मिळाले. वडील दिवंगत गंगाधरराव फडणवीस विधान परिषदेचे आमदार होते. काकू शोभाताई फडणवीस या आमदार आणि राज्याच्या मंत्रीही राहिल्या. त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करताना जनसंपर्क वाढला आणि वयाच्या अवघ्या २२ व्या वर्षी, १९९२ मध्ये देवेंद्रजी नागपूर महापालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आले. ही केवळ सुरुवात होती.”
फडणवीसांच्या उच्च शिक्षणाचा फायदा : अजित पवार
“देवेंद्र फडणवीस उच्चशिक्षित मुख्यमंत्री आहेत. त्यांच्याकडे कायद्याची पदवी आहे. परदेशात त्यांनी मॅनेजमेंटचा अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. त्यांना सामाजिक प्रश्नांची जाण आहे. आर्थिक प्रगतीचा ध्यास आहे. मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी पार पाडताना त्यांना हे ज्ञान, जाण, ध्यास, अनुभवाचा निश्चितच उपयोग होत आहे. ते अष्टावधानी आहेत. एकावेळी अनेक जबाबदाऱ्या पेलण्याचं कौशल्य त्यांच्याकडे आहे. सततची कार्यमग्नता हा त्यांचा गुण विशेष महत्वाचा आहे. वकिलीचं ज्ञान आणि संवादाचं कौशल्य जोरावर राजकीय सभा गाजवण्यात, विधिमंडळात प्रभावी मांडणी करण्यात ते यशस्वी ठरले आहेत.”
अजित पवारांनी सांगितली बालपणीची आठवण
“अलिकडेच देवेंद्र फडणवीसांच्या शिक्षकांनी, मित्रांनी सांगितलेल्या त्यांच्या शालेय आणि महाविद्यालयीन जीवनातील आठवणी नुकत्याच वाचनात आल्या. देवेंद्र फडणवीस शालेय जीवनातही विनम्र, शिस्तप्रिय विद्यार्थी होते. ते स्वतः मस्ती करत नसत. परंतु, सहकारी मित्रांच्या मस्तीमुळे सामूहिक शिक्षेचा फटका त्यांना बसायचा. परंतु, आपण मस्ती केली नाही किंवा मित्रांनी मस्ती केली, अशी तक्रार किंवा मित्रांची चुगली करण्याचा प्रकार त्यांच्या हातून कधी घडला नाही. मैत्री जपणं हा शालेय, महाविद्यालयीन जीवनातील गुण त्यांनी आजही तितकाच जपला आहे, याचा अनुभव माझ्यासह त्यांच्याबरोबर राजकारण, समाजकारणात काम करणाऱ्या अनेक सहकाऱ्यांनी वेळोवेळी घेतला आहे. देवेंद्रजीं राजकारणात असले तरी त्यांना साहित्याची, कलेची आवड आहे. ते स्वतः उत्तम गायक आहेत. विद्यार्थीदशेपासून असलेली गायनाची आवड त्यांनी आजही प्रयत्नपूर्वक जोपासली आहे, ही बाबही तितकीच कौतुकाची आहे. शालेय, महाविद्यालयीन जीवनात एक सर्वसाधारण विद्यार्थी म्हणून वर्गात शेवटच्या बाकावर बसणं पसंत करणारे देवेंद्र, आज राज्याचे मुख्यमंत्री म्हणून मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरील मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत किंवा विधिमंडळाच्या सभागृहांमध्ये पहिल्या रांगेत मुख्यमंत्र्यांच्या पहिल्या खुर्चीत बसतात, ती गोष्ट माझ्यासारख्या त्यांच्या अनेक सहकाऱ्यांना, मित्रांना सुखावणारी, आनंद देणारी असते. त्यांच्या व्यक्तिमत्वातूनही कार्यकर्त्यांना खूप काही शिकता येण्यासारखं आहे. अलीकडे शिक्षणाच्या, परीक्षांच्या ओझ्यानं बालपण, तरुणपण हरवून बसलेल्या मुलांना, युवकांना देवेंद्र फडणवीसांच्या जीवनप्रवासातून प्रेरणा, आत्मविश्वास मिळेल, असं मला वाटतं.”
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
अजित पवारांकडून खास शुभेच्छा
अजित पवार म्हणाले, “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माझा वाढदिवस २२ जुलै या एकाच दिवशी येतो. याशिवाय राजकीय आणि वैयक्तिक जीवनातील अनेक साम्यस्थळं आमच्यात आहेत. देवेंद्रजींचे वाढदिवसाच्या निमित्ताने मी पुनःश्च अभिनंदन, अभिष्टचिंतन करतो. भविष्यकाळात त्यांना अधिक मोठी जबाबदारी आणि ती यशस्वी करण्याचं बळ मिळो. निरोगी, उदंड आयुष्य लाभो, अशी प्रार्थना करतो. देवेंद्रजी, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…”