Ajit Pawar : राज्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. त्या अनुषंगाने सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी आतापासून जोरदार मोर्चे बांधणी सुरू केली आहे. अनेक नेत्यांचे राज्यातील विविध भागात दौरे सुरू असून पक्ष संघटनेचा आढावा घेतला जात आहे. तसेच आगामी महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने नेते मंडळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत आहेत.

असं असतानाच नुकतंच काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या नागपूरमधील कार्यालयात महिला कार्यकर्त्यांनी ठुमके लावत लावणी सादर केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर विरोधकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर टीकेची झोड उठवली होती.

त्यानंतर अखेर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडून सारवासारव करण्यात आल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान, या पार्श्वभूमीवर आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एका कार्यक्रमात बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्वच कार्यकर्त्यांना महत्वाच्या सूचना दिल्या आहेत. ‘आपल्याकडून कोणतीही चूक होऊ देऊ नका’, अशा सूचना अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना दिल्या असून त्यांनी पक्षाच्या कार्यालयातील लावणीच्या व्हिडीओवर अप्रत्यक्षपणे भाष्य केलं आहे.

अजित पवार काय म्हणाले?

“राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तुम्ही सदस्य झालेले असल्यामुळे आणि परिवारातील एक घटक झालेले असल्यामुळे आपण आपल्याकडून कोणतीही चूक होऊ देऊ नका. तसेच कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करू नका. संविधानाचा आदर करा. आपण विकासाच्या कामाला एकमेकांना सहकार्य करत राहू. कुठेही सर्वसमान्यांवर अन्याय होत असेल तर तो अन्याय दूर करण्यासाठी आपण एकमेकांना साथ देऊ”, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.

राष्ट्रवादीच्या कार्यालयात लावणी, नेमकं काय घडलं होतं?

राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका कार्यालयात दिवाळी मिलन कार्यक्रमात महिला कार्यकर्त्यांनी ठुमके लावत लावणी सादर केली होती. पक्षातील काही पदाधिकाऱ्यांनी नागपुरातील अधिकृत पक्ष कार्यालयात दिवाळी मिलनच्या नावाखाली ‘वाजले की बारा.. आता जाऊ द्या की घरी’ ही लावणी जोरदारपणे सादर केली होती. त्यामुळे पक्षावर टीका झाली होती.