वादांच्या पार्श्वभूमीवर आयोजकांची पुन्हा शरणागती, डॉ. श्रीपाद जोशी यांचा राजीनामा मंजूर

नयनतारा सहगलप्रकरणी वादंग सुरूच असताना शेतकरी आत्महत्यांचा दाखला देत किसान न्याय हक्क समितीने संमेलन उधळण्याचा दिलेला इशारा लक्षात घेऊन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या पत्नीच्या हस्ते करण्याचा निर्णय आयोजकांनी घेतला आहे.

महामंडळाच्या उपाध्यक्षा विद्या देवधर यांनी गुरुवारी यवतमाळात आयोजित पत्रकार परिषदेत याबाबतची घोषणा केली. तसेच डॉ. श्रीपाद जोशी यांनी दिलेला महामंडळ अध्यक्षपदाचा राजीनामा महामंडळाच्या गुरुवारी झालेल्या बैठकीत मंजूर करण्यात आला. विदर्भ साहित्य संघाने नवीन अध्यक्षांचे नाव न सुचवल्याने संमेलनापुरतो महामंडळाचे नेतृत्व उपाध्यक्षा विद्या देवधर याच करणार आहेत.

यवतमाळात झालेल्या साहित्य महामंडळाच्या बैठकीत आयोजकांनी राजुर कळंब येथील आत्महत्या केलेले शेतकरी सुधाकर येडे यांच्या पत्नी वैशाली यांचे नाव उद्घाटक म्हणून सुचविले. महामंडळाने तत्काळ या नावावर शिक्कामोर्तब केले.

नयनतारा सहगल यांचे निमंत्रण ऐनवेळी रद्द केल्यावरून आयोजक आणि महामंडळाला अजूनही टीकेची झोड सहन करावी लागत आहे. या पार्श्वभूमीवर पुढचा उद्घाटक कोण होईल, याकडे साहित्य विश्वाचे लक्ष लागले होते. अखेर या विषयावर आयोजकांनी हा पर्याय शोधून पडदा टाकला आहे. वैशाली येडे यांना दोन मुले असून त्यांच्याकडे तीन एकर शेती आहे. शिवाय त्या अंगणवाडीत मदतनीस म्हणूनही कार्य करीत आहेत.

दरम्यान, साहित्य संमेलन साधेपणानेच व्हावे, अशी अपेक्षा संमलेनाध्यक्ष डॉ. अरुणा ढेरे यांनी निवड जाहीर होताच व्यक्त केली होती. संमेलनात वाङ्मयीन चर्चेची श्रीमंती असावी, असेही त्या म्हणाल्या होत्या.

मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीत आज उद्घाटन

शुक्रवारी दुपारी ४ वाजता पोस्टल ग्राऊंड, समता मैदान येथे साहित्य संमेलनाचे उद्घाटन होणार असले तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या उद्घाटनास उपस्थित राहणार नाहीत. पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार उद्घाटनाला मुख्यमंत्री येणार होते. परंतु ऐनवेळी त्यांचा दौरा रद्द झाला. दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी ते संमेलनाला भेट देतील, असे आयोजकांनी कळविले आहे. संमेलनाध्यक्ष अरुणा ढेरे, राज्याचे मराठी भाषा आणि सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे, पूर्व संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख, स्वागताध्यक्ष मदन येरावार यांच्या प्रमुख उपस्थितीत  वैशाली येडे यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन होणार आहे.

१० साहित्यिकांचा सहभागास अधिकृत नकार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नयनतारा सहगल यांचे निमंत्रण रद्द केल्याच्या निषेधार्थ संमेलनातील १० निमंत्रित साहित्यिकांनी संमेलनात सहभागी होणार नसल्याचे कळविले आहे. परंतु त्यामुळे कार्यक्रम पत्रिकेत काहीही बदल होणार नाही, असे सांगत  बहिष्कार टाकणाऱ्या साहित्यिकांनी आपल्या भूमिकेवर पुर्नविचार करून संमेलनात सहभागी व्हावे, असे आवाहन विद्या देवधर यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना केले.