अकोले : अगस्ति ऋषी पायी पालखी दिंडी सोहळ्याने आज, शनिवारी भक्तिमय व उत्साही वातावरणात अकोलेहून पंढरपूरकडे प्रस्थान केले. गेल्या पंधरा वर्षांपासून पालखी सोहळ्याच्या निमित्ताने पर्यावरणाचा संदेश देत अगस्ती ऋषी आश्रमातून ही दिंडी रवाना होते.
आश्रमात आमदार डॉ. किरण लहामटे यांच्या हस्ते पादुका पूजन करण्यात आले. आमदार लहामटे हाती टाळ घेत दिंडीत सहभागी झाले. योगी केशवबाबा, अगस्ती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष के. डी. धुमाळ, दिंडी सोहळ्याचे अध्यक्ष राजेंद्र महाराज नवले, दीपक महाराज देशमुख आदी सहभागी झाले आहेत.
सजविलेल्या बैलगाडीतील पालखी सोबतीला अश्व, वारकरी, टाळकरी फुगडी खेळत, ज्ञानोबा-तुकारामाच्या जयघोष करत, महिलांनी डोक्यावर तुळशी वृंदावन घेतले होते. दिंडीतील भाविकांवर पुष्पवृष्टी करण्यात येत होती. शहरात दिंडीचे फटाक्यांच्या आतिषबाजीत स्वागत करण्यात आले. नगराध्यक्ष बाळासाहेब वडजे, उपनगराध्यक्ष शरद नवले, रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष अमोल वैद्य मुख्याधिकारी धनश्री पवार आदी उपस्थित होते.
यावेळी मुस्लिम बांधवांच्या वतीने डॉ. आसिफ तांबोळी यांनी दिंडीचे स्वागत केले. अगस्ति विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे ढोल पथक व विद्यार्थिनींनी भगवे ध्वज हाती घेतले होते. सुगाव ग्रामस्थांनी दिंडीचे पारंपरिक पद्धतीने स्वागत केले.