विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरच बीड जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा झटका बसला आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी बीड जिल्ह्यातून उमेदवारी जाहीर केलेल्या नमिता मुंदडा आणि त्यांचे पती अक्षय मुंदडा यांनी तडकाफडकी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला रामराम ठोकला. नमिता मुंदडा यांनी बीडमध्ये ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत सोमवारी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. मुंदडा यांना भाजपाच्या तिकीटावर केजमधून उमेदवारी दिली जाण्याची दाट शक्यता आहे. मात्र याच पार्श्वभूमीवर अक्षय मुंदडा यांचा एक जुना व्हिडिओ व्हायरल झाला आहे. पत्नीसाठी अक्षय मुंदडा यांनी आपल्या आईला शरद पवारांसंदर्भात दिलेला शब्द पाळला नाही अशी टीका या जुन्या व्हिडिओचा संदर्भ देऊन केली जात आहे.
मुंदडा दांपत्याचा भाजपामध्ये प्रवेश
राष्ट्रवादीला राम राम करुन भाजपामध्ये प्रवेश करणाऱ्या नमिता मुंदडा या राज्याच्या मंत्री दिवंगत डॉ. विमल मुंदडा यांच्या सूनबाई आहेत. विमल मुंदडा यांच्या निधनानंतर केजमधून नमिता यांनी निवडणूक लढवली होती. मात्र, भाजपच्या संगीत ठोंबरे यांच्याकडून त्यांना पराभव पत्करावा लागला होता. पराभवानंतरही राष्ट्रवादीनं त्यांना पुन्हा संधी दिली होती. असे असतानाही मुंदडा यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना एक ओळीचे राजीनामा पत्र पाठवत पक्ष सोडत असल्याचे जाहीर केले.
मुंदडा कुटुंबाचा इतिहास
बीडमधील राजकारणामध्ये मुंदडा कुटुंबाचे नाव प्रामुख्याने घेतले जाते. अक्षय मुंदडा यांच्या डॉ. विमल मुंदडा या राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांपैकी एक होत्या. त्यांनी पाच वेळा केज-अंबेजोगाई विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले होते. पहिल्या दोन वेळा त्या भाजपाच्या तिकीटावरुन निवडुण आल्या होत्या. तर त्यानंतर तीनदा त्या राष्ट्रवादीच्या तिकीटावरुन विधासभा निवडणुक जिंकल्या होत्या. राष्ट्रवादीच्या स्थापनेपासूनच त्यांनी शरद पवारांच्या नेतृत्वाखाली पक्ष वाढवण्यासाठी काम केले. आघाडी सरकारच्या कार्यकाळामध्ये त्यांनी ९ वर्षे कॅबिनेट मंत्री तसेच राज्यमंत्री पद भूषवले. राष्ट्रवादीच्या तिकीटावर तिसऱ्यांदा निवडुण आल्यानंतर आमदार असतानाच २२ मार्च २०१२ रोजी त्यांचे कर्करोगाने निधन झाले.
काय शब्द दिला होता आईला
महिन्याभरापूर्वी बीडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा संकल्प मेळावा पार पडला होता. या मेळाव्याला शरद पवारही उपस्थित होते. या मेळाव्यामध्ये अक्षय मुंदडा यांनी केलेले भाषण चांगलेच गाजले होते. या भाषणामध्ये त्यांनी आपल्या आईची पक्षासाठी असणारी निष्ठा किती होती हे सांगितले. आईच्या आठवणींबद्दल बोलताना त्यांनी “मुंदडा कुटुंबाची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शरद पवार यांच्यावर खूप श्रद्धा आहे,” असं वक्तव्य केलं होतं. भाषणाच्या शेवटी अक्षय यांनी आईच्या मृत्यूपुर्वी तिला एक शब्द दिल्याचा किस्सा सांगितला. ‘२२ मार्च २०१२ ला माझ्या आईचे निधन झाले. त्याच्या दोन तीन दिवस आधी शरद पवार साहेब तुम्ही त्यांना भेटून गेला होता. तुम्ही गेल्यानंतर माझ्या आईने माझा हात धरला आणि अक्षय गरज पडली तर राजकारण सोड पण पवार साहेबांना सोडू नको असं मला माझ्या आईने सांगितलं होतं’ अशी आठवण अक्षय यांनी करुन दिली होती. तुम्हीच पाहा या भाषणाचा व्हिडिओ
आता मुंडदा दांपत्य भाजपामध्ये गेल्यानंतर याच भाषणाची चर्चा पुन्हा सुरु झाली आहे. अक्षय मुंदडा यांच्या पत्नीला खुद्द पवार यांनी उमेदवारी जाहीर केल्यानंतरही ते पवारांची साथ सोडून भाजपमध्ये प्रवेश केला. बायकोसाठी अक्षय यांनी आईचा शब्द पाळला नाही अशी टीका राष्ट्रवादीच्या समर्थकांकडून केली जात आहे.