सिंधुदुर्ग किनाऱ्यावर घुसखोरी करणाऱ्या मच्छीमारांना इशारा

यापुढे सागर किनाऱ्यालगत परराज्यातील ट्रॉलर्सना रोखण्याचा इशारा पारंपरिक मच्छीमारांनी दिला आहे.

देवगड आणि मालवण समुद्र किनाऱ्यालगत गोवा राज्यातील ट्रॉलर्सधारक मच्छीमारांनी घातलेला धुडगूस पारंपरिक मच्छीमारांना मच्छी दुष्काळाची काळजी करणारा ठरत असतानाच मालवणमधील पारंपरिक मच्छीमार आणि गोवा राज्यातील मच्छीमारांचे भांडय़ाला भांडे लागले आहे. यापुढे सागर किनाऱ्यालगत परराज्यातील ट्रॉलर्सना रोखण्याचा इशारा पारंपरिक मच्छीमारांनी दिला आहे. सिंधुदुर्गच्या समुद्रात गोवा, कर्नाटक, गुजरात व केरळ राज्यातील ट्रॉलर्सधारक सिंधुदुर्गच्या किनाऱ्यालगत मच्छीमारी करत असल्याच्या तक्रारी गेली अनेक वर्षे आहेत, पण सरकारला काही जाग येत नाही आणि गस्ती नौका परप्रांतीय ट्रॉलर्सधारकांना रोखत नसल्याने मालवणमधील पारंपरिक मच्छीमारांची एकजूट त्यावर लढा देत आहे. मच्छीमार नेते छोटू सावजी, रविकिरण तोरसकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी पर्ससिन मच्छीमारीविरोधात संघर्ष करतानाच गोवा राज्यातील अवैध मच्छीमारी करणाऱ्या ट्रॉलर्सना रोखले. गोवा राज्यातील मच्छीमार ट्रॉलर्स रोखून चर्चेसाठी येण्याचे ऐलान केल्यावर गोवा राज्यातील मच्छीमारांचा समझोता करारावर पाणी पडले. मालवण येथे गोवा व मालवणमधील मच्छीमारांत झालेल्या चर्चेच्या दरम्यान जोरदारपणे शाब्दिक चकमक उडाली. गोवा राज्यात सिंधुदुर्गातील वाहने रोखली जातील अशी भाषा करणाऱ्यांना मालवण पारंपरिक मच्छीमार नेत्याने रोखठोक भाषेत सुनावलेदेखील, पण गोवा राज्यातील मच्छीमारांची अरेरावी सुरूच होती. मालवणमधील पारंपरिक मच्छीमार गोवा राज्यातील ट्रॉलर्सधारकांची अरेरावी खपवून घेणार नाहीत. आता यापुढे समुद्रातच आरपारची लढाई लढण्याचा इशारा मच्छीमार नेते रविकिरण तोरसकर यांनी दिला आहे. सुमारे ३५० पारंपरिक मच्छीमारांनी एकजूट दाखवत सिंधुदुर्ग समुद्रकिनाऱ्यावर येऊन मच्छीमारी करणाऱ्या परराज्यातील ट्रॉलर्सधारकांना रोखण्याचा इशारा दिला आहे.
मालवणमधील पारंपरिक मच्छीमार एकजूटपणे लढा देत आहेत. आता महाराष्ट्र राज्याच्या मत्स्योद्योग मंत्र्यांनी या प्रश्नावर लक्ष द्यावे अशी मागणी आहे. राजकीय पाठिंबा घेण्यापेक्षा आपला हक्क कोणी हिसकावून घेत असेल तर एकजुटीने समुद्रातच लढा देण्याचा इशारा मच्छीमारांनी दिला आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Alert warning to those who try to do infiltration at sindhudurg cost