Alibag Medical College Construction अलिबाग- राजकीय मदभेद आणि स्थानिकांच्या विरोध आणि इतर तांत्रिक कारणामुळे रखडलेले अलिबाग येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे काम अखेर मार्गी लागले आहे. पुढील दोन वर्षात हे काम पूर्ण होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्य विभागाने २०१२ साली अलिबाग येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला मंजूरी दिली होती. मात्र त्यानंतर ९ वर्ष हा प्रस्ताव लालफीतीत अडकला होता. २०२१ साली भारतीय आयुर्विद्यान परिषदेनी या वैद्यकीय महाविद्याल सुरू करण्यास मान्यता दिली होती. २०२२ पासून अलिबाग येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू झाले. महाविद्यालयासाठी उसर येथील ५३ एकर जागा महाविद्यालयासाठी उपलब्ध करून देण्यात आली. फेब्रुवारी २०२२ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शरद पवार यांच्या उपस्थितीत महाविद्यालयाच्या कामाचे भुमिपूजन पार पडले होते. मात्र तीन वर्ष प्रत्यक्ष कामाला गती मिळू शकलेली नव्हती.

 महाविद्यालय प्रशासकीय इमारत आणि पाचशे खाटांच्या रुग्णालयाकरता साडे चारशे कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. पहिल्या टप्प्यातील निधी उपलब्धही झाला. निवीदा प्रक्रीया होऊन ठेकेदाराची नियुक्ती करण्यात आली, पण काम मात्र सुरू होऊ शकलेले नाही. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या भुमिपूजनावेळी शिवसेना आमदारांना निमंत्रण न दिल्याने राजकीय वाद उफाळून आला. यानंतर कधी स्थानिकांचा विरोध, तर तांत्रिक कारणामुळे इमारतीचे काम रखडत गेले. सुरुवातीला ईपीआयएल कंपनीला या कामाचा ठेका देण्यात आला होता. मात्र नंतर हा ठेका रद्द करून रॅक इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीकडे हे काम सोपवले गेले. आता तीन वर्षांच्या प्रतिक्षेनंतर महाविद्यालयाच्या प्रत्यक्ष कामाला सुरूवात झाली आहे. त्यामुळे महाविद्यालयाचे काम पुढील दोन वर्षात मार्गी लागण्याची चिन्ह दिसू लागली आहेत.

भाड्याच्या जागेत महाविद्यालयाचा कारभार

दरम्यान इमरातीचे काम रखडल्याने सध्या महाविद्यालयाचा कारभार भाड्याच्या जागेत सुरू आहे. महाविद्यालयासाठी अलिबाग येथील जिल्हा रुग्णालय तीन वर्षासाठी वैद्यकीय शिक्षण विभागाने संलग्न केले. तर आरसीएफ कॉलनीतील २४ इमारती, शाळेची इमारत आणि चार एकर जागा भाड्याने घेण्यात आल्या आहेत. तीन वर्षांचा भाडेकरार संपुष्ठात आला हा करार नुतनीकरणाची प्रक्रीया पुन्हा सुरू करण्यात आली आहे.