अलिबाग नगर परिषदेचा सन २०१५-१६ चा सुधारित व सन २०१६-१७चा जवळपास ४५ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सोमवारी विशेष सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आला. या अर्थसंकल्पात अलिबागच्या सामान्य नागरिकांवर कोणत्याही करवाढीचा बोजा सुचविण्यात आलेला नाही. दुसरीकडे उत्पन्नवाढीसाठी पे अ‍ॅण्ड पार्क योजना सुरू करण्यात येणार आहे. अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकात महसुली उत्पन्नापासून १६ कोटी ८२ लाख रुपये, भांडवली अनुदानातून १२ कोटी २४ लाख रुपये उत्पन्न दाखविण्यात आले असून इतर उत्पन्न ४ कोटी ३ लाख रुपये इतके दाखविण्यात आले आहे. नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांच्या अध्यक्षतेखाली ही विशेष सभा आयोजित करण्यात आली होती. अलिबाग नगर परिषदेस शासनाकडून वैशिष्टय़पूर्ण योजनेअंतर्गत २ कोटी रुपये मिळणार आहेत. यामधून श्रीबाग क्रमांक २ येथे क्रीडासंकुलाचे काम हाती घेण्यात येणार आहे. तसेच शासनाकडून क वर्ग नगर परिषद म्हणून सर्वसाधारण रस्ता अनुदान ३५ लाख रुपये मिळणार आहेत. नगरोत्थान योजनेअंतर्गत चार कोटी रुपये अनुदान प्राप्त होईल. अलिबाग शहरातील नीलिीमा हॉटेल ते चेंढरे मारुती मंदिर, तसेच बालाजी मंदिर ते महावीर चौकपर्यंतच्या रस्त्यांचे काँक्रीटीकरण व आरसीसी गटाराचे बांधकाम नगरोत्थान निधीतून केले जाणार आहे. १४ व्या वित्त आयोगातून प्राप्त होणाऱ्या निधीतून विकासकामे हाती घेतली जाणार आहेत. मागासवर्गीय, दुर्बल व कमकुवत घटकांसाठी खर्च करण्याच्या रकमेतून महिला बाल कल्याणच्या योजना, अंध अपंग कल्याण कृती योजनांसाठी शासनाने ठरवून दिलेल्या निकषांप्रमाणे आवश्यक त्या राखीव निधीची तरतूद करण्यात आली आहे. आरोग्य सोयी-सुविधा कर्मचारी वेतन भत्ते याकरितादेखील स्वतंत्र तरतूद केली गेली आहे. जिल्हा न्यायालय तसेच जिल्हा रुग्णालयासमोरील मोकळ्या जागांचा विकास करून तेथे पे अ‍ॅन्ड पार्क सुरू करण्यात येणार असून त्यामुळे नगर परिषदेच्या उत्पन्नात भर पडणार आहे. तसेच पी एन पी नगर येथे नवीन भाजी मार्कटचे बांधकाम करण्यात येणार आहे . या सभेस नगराध्यक्ष प्रशांत नाईक, उपनगराध्यक्षा सुरक्षा शाह, सर्व विषय समिती सभापती, सर्व ननगरसेवक तसेच विरोधी पक्षनेते अ‍ॅड. प्रवीण ठाकूर, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी नितीन नार्वेकर उपस्थित होते.