येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील डॉक्टरांनी जिवंत व्यक्तीला मृत घोषित केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. प्रभू लक्ष्मण मारभते (६५) असे या व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणामुळे पुन्हा एकदा जिल्हा सामान्य रुग्णालयाचा गलथान कारभार चव्हाटय़ावर आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्हय़ातील सामान्य रुग्णालय विविध सोयींनी युक्त असूनही  वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे रुग्णालय सतत चर्चेत असते.

या खळबळजनक प्रकारामुळे आता या रुग्णालयाच्या विश्वासर्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. प्रभू मारभाते यांच्या छातीत दुखायला लागल्याने नातेवाईकांनी त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. मात्र, रुग्णालयात उपस्थित असलेल्या डॉक्टरांनी त्यांचा इसीजी न काढताच मृत घोषित केल्याचे प्रकरण उघडकीस आले.  वैद्यकीय अधिकारी एवढय़ावरच न थांबता प्रभू मारभते यांना शवागृहात ठेवण्यात आले. मारभते यांचे शवविच्छेन करण्याची आवश्यकता नसल्याचे समजल्यानंतर मारबते यांच्या नातेवाईकांनी रुग्णालयात धाव घेतली. काही निकटचे लोक त्यांचे अंत्यदर्शन घेण्यासाठी शवागृहात पोहोचले. तेव्हा त्यांना आश्चर्याचा धक्का बसला.

मारबते जिवंत असून त्यांच्या तोंडातून लाळ बाहेर पडत होती. आरडाओरड करीत मारबते यांना शवगृहातून उपचार कक्षात आणले गेले. याचा अर्थ रुग्णालयात नेल्यानंतरही ते जिवंत होते. दीड तास म्हणजे रात्री ९ वाजेपर्यंत प्रभू मारबते यांच्यावर उपचार करण्यात आले नाही. रात्री ९ वाजता त्यांची इसीजी काढली तेव्हा त्यांचा मृत्यू झाला होता. रुग्णालयात दाखल केल्यानंतर तात्काळ त्यांच्यावर उपचार झाले असते तर त्यांचे प्राण वाचले असते. यासाठी जबाबदार असलेल्या डॉक्टरांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्यांना निलंबित करावे, अशी मागणी  मृताची पत्नी मनीषा मारबते यांच्यासह नातेवाईकांनी केली आहे.रुग्णालयात दाखल केलेल्या या कर्मचाऱ्यांला डॉक्टरांनी मृत घोषित केले.

मात्र, शवागृहात बघण्यासाठी गेलेल्या नातेवाईकांना कर्मचारी जिवंत आढळल्याने डॉक्टरांच्या कार्यशैलीवार प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Alive man declared dead by doctors from gadchiroli district general hospital
First published on: 20-08-2017 at 02:02 IST