सर्वच समाजाच्या लोकप्रतिनिधींनी मराठा आरक्षणासाठी प्रयत्न करावेत, त्यांच्याशी भेदभाव करु नये असं आवाहन राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांनी केलं आहे. साताऱ्यात गुरुवारी अण्णासाहेब पाटील विकास फाउंडेशनची स्थापना झाली. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

उदयनराजे म्हणाले, “केवळ मराठा समाजाच्याच नव्हे तर सर्वच जातीतील लोकप्रतिनिधींच्या मतदारसंघात मराठा समाज आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधी या नात्याने भेदभाव करणं त्यांच्या प्रतिमेला शोभत नाही. दुसऱ्याचं काढून आम्हाला देऊ नका पण जसं इतरांना न्याय दिला तसा आम्हालाही न्याय मिळायला हवा. प्रत्येकाला वाटतं की मराठा समाज सधन आहे. मात्र, शेतमजूर कष्टकरी मराठा समाजाची अवस्था बिकट आहे. त्यासाठी आरक्षण गरजेचं आहे.”

निवडणुका दर पाच वर्षांनी होतच असतात त्यामुळे मराठा समाजानं हे लक्षात घ्याव की, जर लोकप्रतिनिधी तुमच्या अधिकाऱांसाठी तुम्हाला साथ देणार नसतील तर तुम्ही अशा लोकांच्या पाठीशी उभं राहता कामा नये, असंही यावेळी उदयनराजे म्हणाले.

राज्य सरकारवर टीका करताना उदयनराजे म्हणाले, मराठा समाजाचा प्रश्न सुप्रीम कोर्टात असताना तिथे बाजू मांडता सरकारचे वकील वेळेवर हजर राहत नाहीत, हे जाणीवपूर्वक केल्यासारखचं दिसून येतं. पण हे नक्की का होतं हे माहिती नाही. सरकारमधील सर्व नेते मंडळींना माझी एकच विनंती आहे की, त्यांनी मराठा समाजाचा अंत पाहू नये कारण जर एकदा त्यांचा उद्रेक झाला तर त्याला थांबवणार कोण?

अण्णासाहेबांनी शिवाजी महाराजांचा वारसा चालवला

अण्णासाहेब पाटील यांच्या कार्याचा गौरव करताना उदयनराजे म्हणाले, “अण्णासाहेब हे छोट्याशा खेड्यात जन्माला आले. छत्रपती शिवाजी महाराजांनी जसं मुठभर लोकांना घेऊन समाजाला दिशा देण्याचं काम केलं, त्याप्रमाणे त्यांचाच विचार घेऊन आण्णासाहेबांनी देखील संपूर्ण आयुष्य वेचलं. ज्या असंघटीत कामगार वर्गाने आपल्या उदरनिर्वाहासाठी मोठ्या शहरांकडे धाव घेतली, त्या ठिकाणी त्यांना संघटित करुन सुरक्षित करण्याचं काम आण्णासाहेब पाटलांनी केलं.”

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: All communities mp mla should work for maratha reservation do not discriminate says udayan raje bhosale aau
First published on: 28-01-2021 at 13:38 IST