देशातील सर्व जिल्हा मध्यवर्ती बँका येत्या जून अखेपर्यंत कोअर बँकिंग प्रणालीने जोडणार असल्याचे नार्बाडचे अध्यक्ष डॉ. प्रकाश बक्षी यांनी सांगितले. ते अलिबाग इथे रायगड जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या वतीने देशातील पहिल्या वहिल्या केसीसी डेबिट कार्ड योजनेच्या शुभारंभ सोहळ्यात बोलत होते.
देशात एकूण ३७० जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका आहेत. यापैकी २०५ बँकांच्या ४७०० शाखा कोर बँकिंग प्रणालीने जोडण्यात आल्या आहेत. अद्यापही १६५ बँकांच्या ३००० शाखा कोअर बँकिंग प्रणालीने जोडण्याचे काम बाकी आहे. येत्या जूनअखेपर्यंत देशातील या सर्व जिल्हा मध्यवर्ती बँका कोअर बँकिंग प्रणालीने जोडणार असल्याचे डॉ. बक्षी यांनी सांगितले.
भारत सरकारने कॅशलेस प्रणालीतून विविध योजना पुरवण्याचे धोरण स्वीकारले आहे. योजनेमधील भ्रष्टाचाराला आळा घालणे आणि पारदर्शकता आणणे हा यामागचा उद्देश आहे. याचाच एक भाग म्हणूनही आता शेतकऱ्यांची कर्जेही कॅशलेस करण्याचा प्रयत्न नाबार्डच्या माध्यमातून केला जाणार आहे. देशात पहिल्यांदाच रायगड जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून या केसीसी डेबिट कार्ड योजनेचा शुभारंभ होत असल्याचे बक्षी यांनी या वेळी स्पष्ट केले. किसान डेबिट कार्डच्या माध्यमातून देशभरातील शेतकऱ्यांची टप्प्याटप्प्याने कॅशलेस कर्ज सुविधा सुरू केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
देशात पूर्वी सहकारी बँकांमधून शेतकऱ्यांना मोठय़ा प्रमाणात कर्ज वितरित केले जात असे, मात्र गेल्या काही वर्षांत हे प्रमाण १७ टक्क्यांवर आले आहे. राज्यात हे प्रमाण सात टक्क्यांवर आले आहे. सहकारी बँकांसाठी ही चिंतेची बाब आहे. कॉर्पोरेट बँकांकडून कर्ज घेण्याचा कल वाढतो आहे. त्यामुळे या योजनेच्या माध्यमातून सहकारी बँकांना प्रोत्साहन देण्याचे काम केले जाणार आहे.
केसीसी डेबिट कार्डाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना १ लाखापर्यंतचे कर्ज विनातारण उपलब्ध होणार आहे. वेळच्या वेळी कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना तीन लाखांपर्यंतचे कर्ज केवळ १ टक्के व्याजाने उपलब्ध होणार आहे. शिवाय शेतकऱ्यांच्या कर्जाच्या लिमिटमधे दरवर्षी १० टक्के वाढ केली जाणार आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या व्यवहारात पारदर्शकता यावी आणि त्यांना प्रोत्साहन मिळावे म्हणून केसीसी डेबिट कार्ड योजना राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शेतकऱ्यांच्या गरजेनुसार आणि त्यांच्या क्रेडिट लिमिटनुसार आता कुठेही आणि केव्हाही कर्ज मिळू शकणार आहे. पीक कर्जाबरोबरच, पुशुसंवर्धनासाठी, ट्रॅक्टर तसेच कृषी अवजारांच्या खरेदीसाठी या डेबिट कार्डच्या माध्यमातून कर्ज मिळू शकणार असल्याचे बक्षी यांनी सांगितले.
रायगड जिल्हय़ात आज या योजनेचा शुभारंभ होत असला तरी येत्या काही दिवसांत राज्यातील चार मध्यवर्ती सहकारी बँकांत ही किसान क्रेडिट कार्ड सुविधा सुरू होणार असल्याचे सहकार आयुक्त मधुकरराव चव्हाण यांनी सांगितले. रायगड जिल्हा मध्यवर्ती बँकेने देशात पहिल्यांदा ही सुविधा सुरू करून इतर बँकांनाही आदर्श दाखवून दिल्याचे चव्हाण म्हणाले.
रायगड जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून येत्या सहा महिन्यांत १ लाख शेतकऱ्यांना केसीसी डेबिट कार्डचे वाटप केले जाणार आहे. शेतकऱ्यांना विनामोबदला हे कार्ड वितरित केले जाणार आहे. मात्र यासाठी शेतकऱ्यांचे प्रबोधन करणे आणि मानसिकता बदलण्याचे काम करावे लागणार असल्याचे रायगड जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन आमदार जयंत पाटील यांनी सांगितले. मोबाइल एटीएम प्रणालीचेही या वेळी उद्घाटन करण्यात आले.
संग्रहित लेख, दिनांक 19th May 2013 रोजी प्रकाशित
देशातील सर्व जिल्हा मध्यवर्ती बँका जूनअखेर कोअर बँकिंग प्रणालीने जोडणार – डॉ. प्रकाश बक्षी
देशातील सर्व जिल्हा मध्यवर्ती बँका येत्या जून अखेपर्यंत कोअर बँकिंग प्रणालीने जोडणार असल्याचे नार्बाडचे अध्यक्ष डॉ. प्रकाश बक्षी यांनी सांगितले. ते अलिबाग इथे रायगड जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या वतीने देशातील पहिल्या वहिल्या केसीसी डेबिट कार्ड योजनेच्या शुभारंभ सोहळ्यात बोलत होते.
First published on: 19-05-2013 at 02:42 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: All distrect banks in the nation will be connect with core banking dr prakash bakshi