Rupali Chakankar: वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. १६ मे रोजी पुण्यातील वैष्णवी हगवणेने सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्या केली. पुणे पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून यातून इतर माहिती समोर येईल. मात्र महिला आयोगाने या प्रकरणी वेळीच लक्ष घातले नसल्याचा आरोप आता विरोधक करत आहेत. तसेच दोन दिवसांपूर्वी रुपाली चाकणकर यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ‘चिल्लरचा आवाज खूप होतोय’, असे विधान केले होते. या विधानावर आता सर्वपक्षीय महिला नेत्या टीका करत आहेत.
महिला आयोगाला फुलटाईम अध्यक्ष द्या
रुपाली चाकणकर यांच्या एकेकाळच्या सहकारी आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी चाकणकर यांच्यावर जोरदार टीका केली. “सध्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्षा पक्षाच्या पदावरही आहेत. त्यांना दुहेरी भूमिका बजावता येत नसावी. त्यामुळे राज्याच्या महिला आयोगाला आता पार्ट टाइम नव्हे तर फुल टाइम अध्यक्ष मिळावा”, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी स्वतंत्र व्यक्ती नेमावी, अशी मागणी रोहिणी खडसे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून केली आहे.
मुंबई मनपाच्या माजी महापौर आणि शिवसेनेच्या (ठाकरे) नेत्या किशोरी पेडणेकर यांनीही चाकणकर यांच्यावर टीका केली. वृत्तवाहिनीशी बोलताना त्या म्हणाल्या, रुपाली चाकणकर यांचा माज दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्यांच्या बोलण्यात चिल्लर वैगरे शब्द यायला लागले आहेत. संवेदनशील घटना घडल्यानंतर आपण अधिक संवेदनशील होऊन त्याचा विचार केला पाहिजे. पण त्या चॅनेलवरील चर्चेत रूसून निघून जातात. हे काय तुमचे घर आहे का? अशा महिलेचा राजीनामा मागू नये तर थेट राजीनामा घ्यावा. या पदावर एखादी सुसंस्कृत, संवेदनशील महिला बसवावी, अशी मागणी किशोरी पेडणेकर यांनी केली.
न्याय मागणार्या जनतेला चिल्लर समजणार्या रुपाली ताई चाकणकर यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा द्यावा. #RupaliChakankarResign pic.twitter.com/fTWpAl1lEI
— Dr. Dhananjay Jadhav (@DrDJadhavSpeaks) May 23, 2025
रुपाली चाकणकर यांनी दोन दिवसांपूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषदेत चिल्लरचा जास्त आवाज यायला लागला, असे विधान केले होते. या विधानामुळे महिला नेत्यांनी नाराजी व्यक्त केली असून चाकणकर यांचा राजीनामा मागितला जात आहे.
पुण्यात सामाजिक कार्यकर्त्या संगीता तिवारी यांच्या अध्यक्षतेखाली ‘थील्लर पे चिल्लर’ हे आंदोलन करण्यात आले. रूपाली चाकणकरांच्या फोटोवर चिल्लर उधळत चाकणकरांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली.