scorecardresearch

नांदेडमध्ये आज पवारांसह सर्वपक्षीय नेते ; माजी मंत्री कदम यांचा अमृतमहोत्सवी सत्कार

या सोहळय़ासह नांदेड-वसमत येथे शरद पवार यांचे एकाच दिवसांत पाच कार्यक्रम होणार आहेत.

sharad-pawar-news
शरद पवार (संग्रहीत छायाचित्र)

नांदेड : माजी शिक्षणमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कमलकिशोर कदम यांच्या अमृतमहोत्सवी वर्षांनिमित्त शनिवारी येथे सत्कार होणार आहे. या कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह सर्वपक्षीय नेते उपस्थित राहणार आहेत. या सोहळय़ासह नांदेड-वसमत येथे शरद पवार यांचे एकाच दिवसांत पाच कार्यक्रम होणार आहेत.

माजी खासदार केशवराव धोंडगे आणि शरद पवार यांच्या हस्ते कदम यांचा सत्कार होणार असून या सोहळय़ासाठी महाविकास आघाडी सरकारमधील दिलीप वळसे पाटील, एकनाथ शिंदे, राजेश टोपे, धनंजय मुंडे, अमित देशमुख, संजय बनसोडे आदी मंत्री, मराठवाडा विभागातील आजी-माजी आमदार आणि विविध पक्षांचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांचे नाव निश्चित झाले होते. पण ते उपस्थित राहू शकणार नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे नाव नक्की करण्यात आले. जयंत पाटीलही उपस्थित राहू शकणार नसल्याचे समजते. 

कदम यांच्या सत्कार सोहळय़ासह एका स्थानिक बँकेच्या मुख्य कार्यालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन, वसमत येथे दोन कार्यक्रम तसेच पद्मश्री इन्स्टिटय़ूट ऑफ मेडिकल सायन्सेस अ‍ॅन्ड रीसर्च सेंटर या नव्या संस्थेच्या नियोजित रुग्णालयाच्या इमारतीचे भूमिपूजन असे कार्यक्रम शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहेत.   

प्रशासकीय यंत्रणेची तारांबळ 

सार्वजनिक बांधकाम खात्याची नांदेडमध्ये असलेली दोन विश्रामगृहे जमीनदोस्त करण्यात आली आहेत. सध्या छोटे सह्याद्री विश्रामगृह उपलब्ध असून तेथे केवळ सहा कक्ष आहेत. त्यामुळे येणाऱ्या नेत्यांची व्यवस्था करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेची तारांबळ उडाली आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: All party leaders including sharad pawar in nanded today zws

ताज्या बातम्या