अहिल्यानगरः राज्याच्या मंत्रिमंडळाची उद्या, मंगळवारी चौंडी (ता. जामखेड) येथे बैठक होत आहे. ग्रामीण भागात प्रथमच बैठक होत आहे. त्याची सर्व सज्जता चौंडी येथे झाली आहे. आज, सोमवारी सायंकाळपर्यंत २० मंत्र्यांचे दौरे जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाले होते. यातील काही मंत्री आज रात्री अहिल्यानगर, शिर्डी, पुणे येथे मुक्कामास येत आहेत. त्यानंतर ते उद्या, सकाळी चौंडी येथे रवाना होतील. मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री उद्याच हेलिकॉप्टरने चौंडीत दाखल होतील. अहिल्यानगर जिल्ह्यात प्रथमच बैठक होत असल्याने जिल्ह्याचे प्रलंबित प्रश्न मार्गी लागतील याबद्दल नगरकरांच्या अपेक्षा वाढल्या आहेत.
मंत्री, त्यांच्या समवेतचे स्वीय सहायक, इतर अधिकारी यांच्या निवास व्यवस्थेमुळे अहिल्यानगरसह शिर्डीमधील सर्व सरकारी विश्रामगृहे तसेच हॉटेल्स ‘हाउसफुल्ल’ झाले आहेत. याशिवाय आज रात्री किमान २२ ते २५ सचिव दर्जाचे अधिकारी दाखल होणार आहेत. या सर्वांची व्यवस्था करताना जिल्हा प्रशासनाची दमछाक झाली होती. गेल्या काही दिवसांपासून अधिकारी याच कामात व्यस्त होते. जवळपास सर्वच विभागांतील वाहने ताफ्यासाठी अधिग्रहीत करण्यात आली आहेत. शिवाय खासगी वाहने भाडेतत्त्वावर घेण्यात आली आहेत.
मंत्र्यांचा लवाजमा शिर्डी व अहिल्यानगर इथून चौंडीकडे रवाना करण्यासाठी जिल्हा पोलीस प्रशासनाने आज प्रात्यक्षिक घेतले. चौंडी येथे जर्मन हँगर पद्धतीचा विस्तीर्ण, आधुनिक, आग व पाणी प्रतिबंधक मंडप उभारण्यात आला आहे. तो संपूर्ण वातानुकूलित आहे. चौंडीत तीन हेलिपॅड उभारले गेले आहेत. हळगाव येथे आणखी तीन पर्यायी हेलिपॅड तातडीने उभारण्याची व्यवस्था केली आहे.या सर्व व्यवस्थेवर विधान परिषदेचे सभापती राम शिंदे जातीने लक्ष ठेवून आहेत. विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम यांनी यापूर्वीही चौंडीला भेटी दिल्या तसेच गेल्या दोन दिवसांपासून ते मुक्कामी आहेत. मंत्रिमंडळाची बैठक दुपारी १२.३० वाजता आयोजित करण्यात आली आहे.
अहिल्यादेवींची त्रिशताब्दी जयंती
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे चौंडी हे जन्मस्थान आहे. अहिल्यादेवींची यंदा त्रिशताब्दी जयंती साजरी होत आहे. या पार्श्वभूमीवर विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी मंत्रिमंडळाची बैठक चौंडीला आयोजित करण्याची मागणी केली होती. मुख्यमंत्र्यांनी ती मान्य केली.
पावसाचे सावट
हवामान खात्याने आज व उद्या दोन दिवस पावसाचा अंदाज वर्तवत जिल्ह्याला ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे. आज जिल्ह्यातील पारनेर, कोल्हार भागात गारपीट झाली. वादळी पाऊसही झाला. अहिल्यानगर शहरातही पावसाच्या तुरळक सरी कोसळल्या. या पार्श्वभूमीवर मंडप टाकून चौंडी येथे होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीकडे लक्ष लागले आहे.
जिल्ह्यातील प्रश्न मार्गी लागण्याची अपेक्षा
जिल्ह्यात पाटपाण्यासह पिण्याच्या पाण्याचा पुरवठा, रस्ते, उपसा सिंचन योजना, असे अनेक प्रश्न वर्षानुवर्षे रखडलेले आहेत. राष्ट्रीय महामार्गासाठी भूसंपादनाचे प्रस्तावही मार्गी लागलेले नाहीत. जिल्ह्यात सरकारी वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्याची मागणी आहे. रेल्वे मार्ग विस्तारीकरणाकडेही दुर्लक्ष झाले आहे. जिल्ह्यात होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीतून हे प्रश्न मार्गी लागणार का, याची उत्सुकता नगरकरांना लागली आहे. शिवाय ज्ञानेश्वर सृष्टी, चौंडी विकास आराखडा हे महत्त्वाकांक्षी प्रकल्पही मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत.