Ambadas Danve On Sanjay Shirsat : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. या दौऱ्यादरम्यान देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विविध विकास कामांचं उद्घाटन पार पडलं. यावेळी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. मात्र, या कार्यक्रमादरम्यानचा एक व्हिडीओ शिवसेना (ठाकरे) पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी शेअर करत शिवसेना (शिंदे) पक्षाचे नेते तथा मंत्री संजय शिरसाट यांच्यावर जोरदार टीका केली आहे. ‘स्वाभिमान गहाण टाकणं म्हणजे काय ते पाहा’, असं म्हणत संजय शिरसाट यांचा कार्यक्रमातील एक व्हिडीओ शेअर केला आहे.

अंबादास दानवेंनी काय पोस्ट केली?

“‘स्वाभिमान गहाण टाकणे’ म्हणजे काय माहिती आहे? हा व्हिडीओ पाहा! उद्धव ठाकरे साहेबांच्या सभेला पाहुण्यासारखे येणारे फडणवीसांसाठी आज माईक लावायला धावत सुटले आहेत. असा आहे यांचा #महाराष्ट्रधर्म”, असं म्हणत अंबादास दानवे यांनी संजय शिरसाट यांच्यावर टीका केली आहे.

व्हिडीओमध्ये नेमकं काय?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी फडणवीस यांच्या हस्ते विविध विकास कामाचं उद्धघाटन पार पडलं. मात्र, यावेळी झालेल्या एका सभेतील व्हिडीओ अंबादास दानवे यांनी शेअर केला आहे. त्या व्हिडीओमध्ये मंत्री संजय शिरसाट हे देवेंद्र फडणवीस यांना भाषण करण्यासाठी माईक आणि पोडियम व्यासपीठाच्या मध्ये लावण्यास सांगताना दिसत आहेत. मात्र, यावरूनच अंबादास दानवे यांनी संजय शिरसाट यांच्यावर टीका केली आहे.

देवेंद्र फडणवीस यांची उद्धव ठाकरेंवर टीका

काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे हे मराठवाड्याच्या दौऱ्यावर होते. त्यावेळी विविध गावांमध्ये जाऊन उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत राज्य सरकारवर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्यांवरून जोरदार टीका केली होती. यानंतर आज देवेंद्र फडणवीस हे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनीही उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला. फडणवीस म्हणाले की, ‘उद्धव ठाकरे जेव्हा मराठवाड्याच्या दौऱ्यावर आले होते, तेव्हा अंबादास दानवे माणसं शोधत होते. ते आल्यानंतर माणसं देखील आले नाही, लोकांनाही त्यांच्यावर आता विश्वास राहिलेला नाही’, असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार टीका केली.