देशात आजवर अनेक श्रेष्ठ नेते होऊन गेले, मात्र डॉ. बाबासाहेब आंबेडकरांएवढा साहित्यिक व अर्थतज्ज्ञ नेता अद्यापही होऊ शकला नाही, असे असतानाही सकल समाजाला ज्ञानमार्गी करणाऱ्या आंबेडकरांना केवळ दलित नेते म्हणूनच सीमित ठेवण्यात आल्याची खंत ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ व पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. नरेंद्र जाधव यांनी व्यक्त केली.
संगमनेरकरांचा सांस्कृतिक मानिबदू ठरलेल्या कवी अनंत फंदी व्याख्यानमालेत ते बोलत होते. आमदार डॉ. सुधीर तांबे अध्यक्षस्थानी होते. प्रकल्पप्रमुख अनिल राठी, प्रतिष्ठानचे अध्यक्ष जसपाल डंग, प्रदीप मालपाणी उपस्थित होते.
याप्रसंगी जाधव म्हणाले, राजकारणात सक्रिय असतानाही आंबेडकरांची साहित्यसंपदा लक्षणीय आहे. ते खऱ्या अर्थाने उच्चशिक्षित अर्थतज्ज्ञ होते. वित्त आयोगाची संकल्पनादेखील त्यांचीच होती. िहदू धर्माच्या चौकटीत राहून धर्मसुधारणा करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. जातिव्यवस्थेमुळे देशाचे अपरिमित नुकसान होत असल्याचे त्यांचे तेव्हाचे मत आजही तंतोतंत खरे ठरते. भाषावार प्रांतरचना करून देशाची उभारणी केली पाहिजे या विचाराचे ते होते. पाच लाख लोकांना सोबत घेऊन त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला. अनेक प्रकारे दबाव आणि वेगवेगळी आमिषे दाखवून धर्मातरे होत असताना केवळ एका व्यक्तीच्या विचारावर श्रद्धा ठेवत एवढे मोठे धर्मातर घडण्याची जगाच्या पाठीवरील ही एकमेव घटना आहे.
आमदार डॉ. तांबे म्हणाले, की भारतीयांनी जगभरात आपल्या बुद्धिमत्तेची छाप पाडली. चांगल्या विचारांच्या माणसांची वानवा नसतानाही आपण एक समर्थ राष्ट्र म्हणून अद्याप उभे राहू शकलो नाही. त्यासाठी सामाजिक परिवर्तनाची गरज आहे. संगमनेरच्या सांस्कृतिक चळवळीत अनंत फंदी व्याख्यानमालेचे योगदान मोठे असल्याचे त्यांनी नमूद केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ambedkar is higher education economist dr jadhav
First published on: 14-11-2013 at 12:13 IST