लातूरमध्ये माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे दिवंगत नेते विलासराव देशमुख यांचा स्मृतीसोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात बोलताना काँग्रेसचे नेते तथा आमदार अमित देशमुख यांनी कोणत्याही पक्षात जाणार नाही, असे स्पष्टपणे सांगितले. तसेच यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, वसंतराव नाईक, शरद पवार यांच्या काळात महाराष्ट्राला जसे दिवस होते, तसे दिवस आणावे लागतील. त्यासाठी काँग्रेसचा विचार प्रत्येक नागरिकापर्यंत न्यावा लागेल, असे अमित देशमुख म्हणाले. या कार्यक्रमात काँग्रेस तसेच राष्ट्रवादीचे महत्त्वाचे नेते उपस्थित होते.
“ते दिवस पुन्हा आणायचे असतील तर…”
“सध्या या देशात, राज्यात नवी राजकीय परिस्थिती पुढे आली आहे. समाजाशी जुडलेली नाळ तोडून इकडे-तिकडे जाणं सुरू आहे. पण महाराष्ट्राच्या सर्वसामान्य माणसाला हे पटणार नाही, याची मला खात्री आहे. आपल्याला सामान्य माणसाचा विश्वास संपादन करायचा आहे. यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, वसंतराव नाईक, शरद पवार, विलासराव देशमुख यांच्या काळात काँग्रेसला जे दिवस होते, तेच दिवस पुन्हा महाराष्ट्रात आणायचे आहेत. ते दिवस पुन्हा आणायचे असतील तर महाराष्ट्रातील प्रत्येक माणसापर्यंत आपले विचार न्यावे लागतील,” असे मत अमित देशमुख यांनी मांडले.
“मी तुमच्याबरोबर आहे”
आज आपल्याकडे सगळे आस लावून पाहात आहेत. महाराष्ट्रतील जनतेने आपल्यावर फार मोठी जबाबदारी टाकली आहे. त्यामुळे आपल्याला काम करावे लागेल. मी तुमच्याबरोबर आहे, असे स्पष्टीकरण अमित देशमुख यांनी दिले.
“विलासराव देशमुख यांच्यावरही कारवाई करण्यात आली होती”
“विलासराव देशमुख यांच्यावरही कधीकाळी कारवाई करण्यात आली होती. त्यांना काँग्रेस पक्षातून काही काळासाठी बेदखल करण्यात आले होते. त्या काळातही पत्रकारांशी संवाद साधत असताना ‘मला कोणी काँग्रेस पक्षातून काढून टाकेल. पण माझ्या रक्तातील काँग्रेस कशी काढणार,’ असे विलासराव देशमुख म्हणाले होते. विलासरावांचे हे वाक्य आजच्या राजकीय परिस्थितीवर महत्त्वाचे आहे,” असे अमित देशमुख यांनी सांगितले.
“मी काँग्रेसमध्येच बरा आहे”
दरम्यान, या भाषणात अमित देशमुख यांनी मी कोणत्याही अन्य पक्षात जाणार नाही, हेदेखील स्पष्ट केले. मी काँग्रेसमध्येच बरा असे त्यांनी सांगितले. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या भाजपा प्रवेशानंतर अमित देशमुखही भाजपात जाणार असा दावा केला जात होता. त्या चर्चांवर आता अमित देशमुख यांच्या वरील स्पष्टीकरणानंतर पडदा पडला आहे.