अमित शहा यांचे काँग्रेसवर टीकास्त्र

सांगली : ‘३७० कलम’ हटविणे अशक्य असल्याचे सर्वाना वाटत होते. ते काम पंतप्रधान नरेंद्र मोदींनी करून दाखवले आहे. आज या मुद्दय़ावर संपूर्ण जग पंतप्रधान मोदी यांच्यासोबत आहे. सगळे जग समर्थन करत असताना काँग्रसचे राहुल गांधी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांनी मात्र हे कलम हटविण्यास विरोध केला. देशाच्या सुरक्षेच्या संदर्भातील या मुद्दय़ाचेही त्या वेळी या नेत्यांनी राजकारण केल्याची टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी येथे बोलताना केली. घराणेशाही जपणाऱ्या काँग्रेस व राष्ट्रवादीने महाराष्ट्राला मागे नेण्याचे काम केल्याची टीकाही  या वेळी त्यांनी केली.

भाजपचे उमेदवार विलासराव जगताप यांच्या प्रचारार्थ गुरुवारी जतमध्ये केंद्रीय मंत्री शहा यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत मोदी बोलत होते.

शहा म्हणाले, की देशाचे नेतृत्व आता मौनीबाबांकडे नव्हे तर ५६ इंचाची छाती असलेल्या पंतप्रधानाकडे आहे, यामुळेच पाकिस्तानात घुसून अतिरेकी प्रवृत्तींना नष्ट करणे शक्य झाले. देश चालवताना, सांभाळताना असे कणखर नेतृत्वच लागते. जे आजवर काँग्रेसने न दिल्याने देशाच्या सुरक्षेबाबतचे अनेक प्रश्न गंभीर स्थितीला गेले. मौनी बाबा मनमोहन सिंग यांचे सरकार असताना देशाच्या जवानांना अपमानित केले जात होते. आताच्या सरकारची सध्या एवढी जरब आहे, की देशाचे शत्रू कुठलेही दुष्कृत्य करू शकत नाहीत आणि तसा प्रयत्नही केला तर त्याची किंमत त्यांना मोजावी लागत आहे. ५६ इंच छाती असणाऱ्या पंतप्रधान मोदी यांनी आमच्या जवानांच्या वाटेला जाणाऱ्या दहशतवाद्यांना पाकिस्तानात जाऊन मारले. ‘३७० कलम’ हटविणे सर्व जण अशक्य असल्याचे म्हणत होते. ते काम मोदींनी करून दाखवले आहे. जगात मोदींचा सन्मान होत असताना त्याची काँग्रेस, राष्ट्रवादीला पोटदुखी झाली आहे.

भ्रष्टाचारी काँग्रेस व राष्ट्रवादीने महाराष्ट्राला आजवर मागे नेल्याची टीका करत अमित शहा म्हणाले, की स्वातंत्र्यानंतरच्या काळात महाराष्ट्र सरकारी नोकऱ्या, कृषी, उद्योग, दुग्ध उत्पादनांत आघाडीवर होता. मात्र, त्यानंतर काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सरकारच्या काळात  देशात आघाडीवर असलेला महाराष्ट्र विकासात मागे पडला.  त्यानंतर राज्यातील फडणवीस सरकार आणि केंद्रातील मोदी सरकारमुळे पुन्हा देशात महाराष्ट्राचा दबदबा वाढत असून राज्य पहिल्या क्रमांकाच्या दिशेने वेगाने पुढे जात आहे.

काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीने सत्तेच्या १५ वर्षांच्या काळात काय केले याचा हिशोब द्यावा असे सांगत ते म्हणाले की, घराणेशाही जोपासणारे काँग्रेस-राष्ट्रवादी हे पक्ष सगळे नातेवाईक मदानात उतरवून भ्रष्टाचार तळापर्यंत पोहचवण्याचे काम करीत आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सत्तेच्या काळात राज्यासाठी काय केले. शरद पवारांनी पंधरा वर्षांत महाराष्ट्राच्या लोकांसाठी काय केले? तुमच्या ५५ वर्षांच्या कामांपेक्षा आम्ही पाच वर्षांत केलेली कामं अधिक आहेत, असा दावा या वेळी शाह यांनी केला.