Amit Shah Maharashtra BJP New Office in Mumbai Churchgate : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे आज (२७ ऑक्टोबर) मुंबई दौऱ्यावर आले आहेत. त्यांच्या हस्ते दक्षिण मुंबईत महाराष्ट्र भाजपाच्या नवीन कार्यालयाचं भूमिपूजन पार पडत आहे. यावरून शिवसेनेच्या (उबाठा) व राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार) नेत्यांनी सरकारवर आरोप केले आहेत. तसेच हे भाजपा कार्यालय बांधण्यासाठी जमीन बळकावल्याचा आरोपही केला आहे. शिवसेनेचे (उबाठा) खासदार संजय राऊत म्हणाले, “मुंबईतलं मराठी भाषा भवन रखडलं आहे, अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीची फाईल सरकार दरबारी पडून आहे. मात्र, भाजपा कार्यालयासाठी वेगाने सूत्र हलली.”

संजय राऊत म्हणाले, “मरीन लाइन्सला अद्याप मराठी भाषा भवन होऊ शकलेलं नाही. भूमिपूजन होऊनही मराठी भाषा भवन अडकून पडलं आहे. त्याकडे कोणाचंही लक्ष जात नाही. मात्र, आज केंद्रीय गृहमंत्री मुंबईत येऊन भाजपाच्या पंचतारांकित कार्यालयाचं भूमिपूजन करत आहेत.”

“मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या मदतीची फाईल अजून हलली नाही. दिवाळी झाली तरी शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही. मात्र, भाजपाच्या पंचतारांकित हेडक्वार्टरची फाईल राफेलच्या वेगाने हलली. हे सगळं इतक्या वेगानं कसं झालं याचं रहस्य त्याच जमिनीखाली दडलं आहे. अमित शाह आज भूमिपूजन करत आहेत. त्यासाठी ते कुदळ मारतील तेव्हा हे रहस्य बाहेर येईल.”

इमारत धोकादायक दाखवून पाडली आणि आता तिथेच भाजपा कार्यालय उभारलं जातंय : रोहित पवार

दुसऱ्या बाजूला या भाजपा कार्यालयाबाबत राष्ट्रवादीचे (शरद पवार) आमदार रोहित पवार म्हणाले, “राज्यात जमीन घोटाळे जोमात असताना आज मुंबईत भूमिपूजन होत असलेल्या भाजपा कार्यालयाच्या जागेबाबत देखील वेगवेगळ्या चर्चा चालू आहेत. सदरील जागा महाराष्ट्र हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशनची ९९ वर्षे लीजवर घेतलेली जागा असून इमारत धोकादायक आहे असे दाखवून ती ताब्यात घेऊन पाडण्यात आली आणि त्या ठिकाणी भाजपा कार्यालयाचे भूमिपूजन होत असल्याची चर्चा आहे.”

आमदार रोहित पवार म्हणाले, “एकीकडे पुण्यातील जैन बोर्डिंग प्रकरणात मोठ्या प्रमाणात रोष असताना भाजपा कार्यालयाच्या जागेबाबतच चर्चा चालू असेल तर जनतेत चुकीचा संदेश जाऊ शकतो, त्यामुळे भाजपा नेत्यांनी यावर खुलासा करणं योग्य राहील.”