राहाता : केंद्रीय गृह तथा सहकार मंत्री अमित शहा रविवारी (दि. ५) राहाता व कोपरगाव तालुक्याच्या दौऱ्यावर येत आहेत. लोणी येथे शहा यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर जय्यत तयारी करण्यात आली आहे. शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे हे शिर्डी ते लोणी मोटारीने प्रवास करण्याची शक्यता गृहीत धरून रस्त्यांच्या दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले आहे. या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर राहाता व कोपरगाव तालुक्यात ड्रोन उडविण्यास दोन दिवस बंदी घालण्यात आल्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने आज काढले आहे. अमित शहा यांचा दौरा पालकमंत्री राधाकृष्ण विखे व जिल्हा बँक संचालक विवेक कोल्हे यांना राजकीय बळ देणारा ठरणार आहे.
केंद्रीय सहकार मंत्री शहा हे सहकाराच्या भूमीत, लोणी येथे दुसऱ्यांदा येत असून, यापूर्वी सहकार मंत्रालयाची धूरा त्यांच्याकडे आल्यानंतर त्यांच्या उपस्थितीत राज्यातील पहिली सहकार परिषद प्रवरानगर येथे झाली होती. त्यानंतर विखे यांनी राज्यातील साखर कारखान्यांच्या पदाधिकाऱ्यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली शहा यांची दिल्लीत बैठक घेऊन कारखान्यांचा वर्षानुवर्षे प्रलंबित प्राप्तीकराचा प्रश्न मांडला. शहा यांनी तातडीने निर्णय घेऊन कारखान्यांचा प्राप्तीकर माफ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. सहकारातील महत्त्वाचे प्रश्न शहा यांच्याकडून मार्गी लावण्यात विखे यांना यश आले. महसूल मंत्री म्हणून त्यांना काम करण्याची संधी मिळाली होती. मराठा आरक्षणाचा प्रश्न विखे यांनी यशस्वीपणे सोडविल्याबद्दल त्यांचे राजकीय वजन राज्यात व दिल्लीत वाढल्याची राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे.
कोपरगाव विधानसभा निवडणुकीत भाजपकडून माजी आमदार स्नेहलता कोल्हे व त्यांचे पुत्र विवेक कोल्हे इच्छुक होते. त्यापूर्वी विवेक कोल्हे यांनी नाशिक शिक्षक पदवीधर मतदार संघातून निवडणूक लढविली. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) भाजपसोबत सत्तेत सहभागी असल्याने विद्यमान आमदार आशुतोष काळे यांना उमेदवारी अंतिम होताच विवेक कोल्हे नाराज झाले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोल्हे मायलेकाची मनधरणी करून त्यांची दिल्लीत अमित शहा यांची भेट घडवून दिल्यानंतर कोल्हे यांनी राष्ट्रवादीचे आमदार काळे यांच्या विजयाला हातभार लावला. या पार्श्वभूमीवर अमित शहा कोल्हे यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत. या निमित्ताने कोल्हे यांचे राजकीय पुनर्वसन होणार का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून आहे.
जिल्ह्यात उत्तर भागापेक्षा दक्षिणेत अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाल्याने त्यांना मदत करणे, शेतकऱ्यांंची कर्जमाफी, सहकारी साखर कारखान्यांचे धोरण याबाबत शहा काही घोषणा करतात का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या निमित्ताने शहा व राज्यातील भाजप नेत्यांच्या या राजकीय दौऱ्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य निर्माण होण्यास मदत होणार आहे.