scorecardresearch

“शाळिग्राम नावाच्या माकडाने…”, तुषार भोसलेंचा ‘झाकणझुल्या’ उल्लेख करत मिटकरींची जोरदार टीका

तुषार भोसलेंनी अजित पवारांवर केलेल्या टीकेला अमोल मिटकरींनी प्रत्युत्तर दिलं आहे.

“शाळिग्राम नावाच्या माकडाने…”, तुषार भोसलेंचा ‘झाकणझुल्या’ उल्लेख करत मिटकरींची जोरदार टीका
फोटो-लोकसत्ता ग्राफिक्स टीम

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अजित पवार यांनी अलीकडेच छत्रपती संभाजी महाराजांबद्दल केलेल्या विधानामुळे राजकीय वातावरण तापलं आहे. हे प्रकरण ताजं असताना आता अजित पवारांनी सावित्रीबाई फुले यांच्या नावाचा चुकीचा उल्लेख केला आहे. त्यांनी बोलण्याच्या ओघात सावित्रीबाई फुले ऐवजी सावित्रीबाई होळकर असा उल्लेख केला आहे. ते पुण्यातील एका कार्यक्रमात बोलत होते.

अजित पवारांचा हा व्हिडीओ समोर आला असून सोशल मीडियात वेगानं व्हायरल होतं आहे. यावरून भाजपा अध्यात्मिक आघाडीचे प्रमुख तुषार भोसले यांनी अजित पवारांवर टीकास्त्र सोडलं आहे. अजित पवारांनी आता तरी माफी मागावी, अशी मागणी भोसले यांनी केली आहे. तुषार भोसले यांच्या मागणीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांनी एक व्हिडीओ जारी करत तुषार भोसले यांच्यावर खोचक टीका केली आहे.

अजित पवारांकडून भाषणाच्या ओघात बोलताना सावित्रीबाई फुलेंचं आडनाव चुकलं असेल, त्यावर तुझा एवढा तिळपापड व्हायचं कारण काय? तू वारकरी तरी आहेस का? तुझ्यामध्ये वारकऱ्यांचं एक तरी लक्षण आहे का? असा सवाल मिटकरींनी विचारला.

संबंधित व्हिडीओत मिटकरी म्हणाले, “शाळिग्राम नावाच्या माकडाने दिवसापण गांजा ओढायला सुरुवात केली आहे, असं दिसतंय. खरंतर हा व्यक्ती कोणत्या पंथाचा आहे? हे आम्ही लवकरच उघडं पाडणार आहोत. दुसरं म्हणजे याला कोणताही धंदा नसल्याने तो फक्त आणि फक्त अजित पवारांवर टीका करण्याचा प्रयत्न करतो. या झाकणझुल्याला मला सांगायचंय की, अरे झाकणझुल्या… अजित पवारांकडून भाषणाच्या ओघात आडनाव चुकलं असेल… यावर तुझा एवढा तिळपापड व्हायची काय गरज आहे? आणि राहिला प्रश्न तुला महापुरुषांबद्दल आदर असण्याचा… तर तू वारकरी तरी आहेस का? तुझ्यामध्ये वारकऱ्यांची कोणती लक्षणं आहेत. ज्यापद्धतीने तू बोलतो त्यामुळे तुला कुणीही भीक घालत नाही. तुला कोणत्या मठातून पाठीवर लाथ घालून बाहेर काढलं होतं, याचा व्हिडीओही आमच्याकडे आहे…”, अशी खोचक टीका मिटकरींनी केली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 07-01-2023 at 00:11 IST

संबंधित बातम्या