सध्या राज्यात विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचीच चर्चा असल्यामुळे राजकीय आरोप-प्रत्यारोप, दावे-प्रतिदावे या गोष्टी सुरू आहेत. आजदेखील सकाळपासून एकीकडे दहीहंडीचा उत्साह दिसून येत असताना राजकीय पक्षांकडून केल्या जाणाऱ्या विधानांमुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागाठण्यात बोलताना भ्रष्टाचाराची हंडी फोडण्यासंदर्भात विधान केलं. या विधानावरून वेगवेगळे तर्क लावले जात असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी ट्विटरवरून देवेंद्र फडणवीसांना लक्ष्य केलं आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी शिंदे गटातील ४० आमदारांचा देखील उल्लेख केला आहे.

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

देवेंद्र फडणवीसांनी आज दिवसभर मुंबई आणि उपनगरात वेगवेगळ्या ठिकाणी दहीहंडी उत्सवात हजेरी लावली. मागाठाण्यात प्रकाश सुर्वे यांनी आयोजित केलेल्या दहीहंडी उत्सवात उपस्थिती लावली असताना देवेंद्र फडणवीसांनी भ्रष्टाचाराची हंडी फोडण्यासंदर्भात विधान केलं. “आता आपण भ्रष्टाचाराची हंडी फोडू आणि विकासाच्या हंडीतून शेवटच्या माणसापर्यंत विकास पोहोचवण्याचं काम आपण करू”, असं ते म्हणाले. तसेच, “आता आपले सरकार आहे. आपले सकार आल्यानंतरर दहीहंडी उत्सव उत्साहात साजरा केला जातो. गणेशोत्सव, नवरात्रोत्सव उत्साहात साजरा केला जातो. एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे, की आता गोविंदा हे खेळाडू असतील. दहीहंडी आता साहसी खेळ आहे. खेळाडूच्या सर्व सुविधा आता गोविंदांना दिल्या जातील. कोणी जखमी झालं तर सरकार तुमच्या पाठीशी आहे. त्यामुळे आता कसं वाटतंय, मोकळं मोकळं वाटतंय. छान छान वाटतंय”, असं देखील ते म्हणाले.

“आता कसं वाटतंय, मोकळं-मोकळं वाटतंय,” दहीहंडी उत्सवात फडणवीसांचे तुफान भाषण

दरम्यान, देवेंद्र फडणवीसांच्या या विधानाच्या संदर्भात अमोल मिटकरींनी ट्वीटमधून फडणवीसांना खोचक टोला लगावला आहे. “देवेंद्र फडणवीस दहीहंडी कार्यक्रमात बोलले, “आम्ही मलई गोरगरीबांपर्यंत पोहचवू”…कदाचित ते सुरत आणि गुवाहाटीमधे बसून गलेलठ्ठ मलाई खाऊन टुम झालेल्या ४० गरीब गोविंदांना ठाण्यातून आणलेल्या मलाईबाबत बोलले असावेत”, असं मिटकरी आपल्या ट्वीटमध्ये म्हणाले आहेत. शिवाय पुढे #मलाईदारसरकार असा हॅशटॅग देखील त्यांनी दिला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या सगळ्या पार्श्वभूमीवर अधिवेशनाच्या उरलेल्या दिवसांमध्येही या आरोप-प्रत्यारोपाच्या राजकारणाचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे.