येथील ऐतिहासिक सायन्स कोर मैदानावर व्यावसायिक ‘मॉल’ उभारण्याच्या जिल्हा परिषदेच्या हालचालींच्या विरोधात अमरावतीत जनमत एकवटले असून मैदान बचाव अभियान कृती समितीने या मैदानावर कुठल्याही परिस्थीतीत व्यापारी संकूल उभारू दिले जाणार नाही, असा निर्धार व्यक्त केला आहे. युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनीही जिल्हा परिषदेसमोर निदर्शने करून मैदानावर बांधकाम करण्यास तीव्र विरोध दर्शवला.
सायन्स कौर मैदानावर व्यापारी संकूल उभारण्यात येत असल्याची माहिती बाहेर येताच अनेक सामाजिक संघटनांनी त्याला विरोध दर्शवला. सायन्स कोर मैदान हे जाहीर सभांपासून ते प्रदर्शन आणि क्रीडा स्पर्धासाठी शहराच्या मध्यभागी उपलब्ध असलेले सर्वात मोठे मैदान आहे. मोठय़ा जाहीर सभांसाठी याच मैदानाला पसंती दिली जाते. गर्दीचे अनेक विक्रम या मैदानाने अनुभवले आहेत. या मैदानावर व्यापारी संकूल उभारून त्यातून निधी जमवण्याच्या जिल्हा परिषदेच्या प्रयत्नांवर सामाजिक आणि क्रीडा संघटनांनी टीका केली आहे.
सायन्स कोर मैदानाने आतापर्यंत हॉकी आणि फुटबॉलचे अनेक नामवंत खेळाडू तयार केले आहेत. लोकप्रबोधन करणारे हे मैदान आज केवळ भाडय़ाने देण्यातच धन्यता मानली जात आहे. या मैदानाचा वापर केवळ व्यापारी उद्देशाने केला जाणे हे चुकीचे आहे. या मैदानावर मॉल बांधण्याची जिल्हा परिषदेची कृती अनाकलनीय असून हा मॉल कोणत्याही परिस्थितीत उभारू दिला जाणार नाही, असे मैदान बचाव कृती समितीचे अध्यक्ष व माजी मंत्री अ‍ॅड. यशवंत शेरेकर यांनी सांगितले.
मैदानाच्या भाडय़ापोटी आतापर्यंत अंदाजे १४ कोटी रुपये उत्पन्न जिल्हा परिषदेने मिळवले आहे. त्याचा हिशेब जिल्हा परिषदेने द्यायला हवा. या मैदानाच्या विकासासाठी जिल्हा परिषदेने कोणतेही प्रयत्न केले नाहीत. मैदानाच्या चारही बाजूंनी घाण आहे. झुडूपे वाढली आहेत. जिल्हा परिषदेने या मैदानासाठी एक रुपया देखील खर्च केला नाही. आता पुन्हा या मैदानाचा वापर व्यापारीकरणासाठी करणे दुर्दैवी असल्याचे अ‍ॅड. शेरेकर यांचे म्हणणे आहे.
सायन्स कोर मैदानाची जागा ही शासनाची असून ती मुलांच्या खेळण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. जिल्हा परिषदेकडे ही जागा हस्तांतरीत करण्यात आली असली, तरी या मैदानाचा वापर व्यावसायिक कामांसाठी होता कामा नये, हे मैदान यापुढे भाडे तत्वावर देण्यात येऊ नये. मैदानाचा उपयोग हा केवळ क्रीडा सरावासाठी, जाहीर सभांसाठी व्हावा, असे शेरेकर म्हणाले. मैदान वाचवण्यासाठी लढा उभारला जात असून वेळप्रसंगी तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही शेरेकर यांनी दिला आहे.
मैदान बचाव समितीच्या लढयाला आता विविध संघटनांनी पाठींबा दिला असून शारीरिक शिक्षण संघटना, युवक काँग्रेस, आंबेडकर टीचर्स असोसिएशनसह जलतरण संघटनेनेही मैदानावर मॉल उभारण्यास विरोध केला आहे.  
सायन्स कोर मैदानावर कोणत्याही पद्धतीचे बांधकाम करण्यात येऊ नये, या मागणीसाठी गुरूवारी युवक काँग्रेसचे अमरावती लोकसभा अध्यक्ष स्वप्निल कोकाटे यांच्या नेतृत्वात युवक कार्यकर्त्यांनी जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन केले. शिष्टमंडळाने जिल्हा परिषद अध्यक्ष सुरेखा ठाकरे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल भंडारी यांना निवेदन देखील दिले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Amravati people fights for science core ground
First published on: 22-02-2014 at 01:32 IST