scorecardresearch

“मला इथे येऊन दोन वर्ष झालेत, पण..”, नवनीत राणांच्या आरोपांवर आरती सिंग यांचं स्पष्टीकरण!

आरती सिंग म्हणतात, “पालिका आयुक्तांवर शाईफेक झाल्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला. तेव्हापासून त्यांनी हे आरोप करणं सुरू केलं आहे. याआधी त्यांनी…!”

“मला इथे येऊन दोन वर्ष झालेत, पण..”, नवनीत राणांच्या आरोपांवर आरती सिंग यांचं स्पष्टीकरण!
आरती सिंग यांचं नवनीत राणांच्या आरोपांवर स्पष्टीकरण

गेल्या काही दिवसांपासून अमरावतीमध्ये राणा दाम्पत्य विरुद्ध पोलीस आयुक्त आरती सिंग असा वाद पाहायला मिळत आहे. नवनीत राणा आणि रवी राणा यांनी आरती सिंग यांच्यावर टीका करताना गंभीर आरोप केल्यानंतर हा वाद सुरू झाला. यानंतर नवनीत राणा यांनी आरती सिंग यांच्यावर वर्दीचा गैरवापर करत असल्याचा आरोप करत आपण त्यांना घाबरत नसल्याचं म्हटलं आहे. नवनीत बोलताना आता पोलीस आयुक्त आरती सिंग यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

नेमका काय आहे वाद?

राणा दाम्पत्याने आरती सिंग यांच्यावर आर्थिक गैरव्यवहाराचा आरोप केल्यानंतर यावरून वाद सुरू झाला आहे. “आरती सिंग यांनी अडीच वर्षांत महिन्याला ७ कोटी रूपये तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पोहचवले असून याप्रकरणाची आता उपमुख्यमंत्री, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सीआयडी चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत”, असा आरोप त्यांनी केला होता. पोलिसांनी फोन कॉल रेकॉर्ड केल्यावरून संतप्त झालेल्या राणा दाम्पत्यानं पोलिसांशी हुज्जत घातली. यासंदर्भात अनेक संघटनांनी राणांविरोधात आयुक्तांना निवेदनं दिली असून त्यावर वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून निर्णय घेणार असल्याचं आरती सिंग यांनी म्हटलं आहे.

“मी घाबरत नाही”

दरम्यान, आरती सिंग यांच्या या भूमिकेवर बोलताना नवनीत राणांनी आपण अशा कारवायांना घाबरत नाही, असं म्हटलं आहे. “माझ्यावर जे गुन्हे दाखल होत आहेत. त्यामागे पोलीस आयुक्त आरती सिंग यांचा हात आहे. मात्र, मी अशा केसेला घाबरत नाही, मी ही लढाई माझ्या नागरिकांच्या न्यायहक्कासाठी लढत आहे”, असं त्या म्हणाल्या.

नवनीत राणांचे अमरावतीच्या पोलीस आयुक्तांवर गंभीर आरोप; म्हणाल्या, “माझ्यावर जे गुन्हे…”

दरम्यान, या सर्व वादावर आता पोलीस आयुक्त आरती सिंग यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. “अमरावती शहरात आरोप करणारं फक्त एकच दाम्पत्य आहे. ते म्हणजे खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा. मला इथे येऊन २ वर्षं झाली. पण आत्तापर्यंत माझ्यावर कोणत्या लोकप्रतिनिधीने अशा प्रकारे आरोप केले नाहीत”, असं आरती सिंग म्हणाल्या.

“गुन्हा दाखल झाल्यापासून आरोप सुरू झाले”

शाईफेकप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यापासून त्यांनी आरोप सुरू केले आहेत, असा दावा आरती सिंग यांनी केला आहे. “पालिका आयुक्तांवर शाईफेक झाल्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला. तेव्हापासून त्यांनी हे आरोप करणं सुरू केलं आहे. याआधी त्यांनी कधीही आरोप केले नाहीत. यावरून आपण त्याचा अर्थ समजू शकतो”, असं आरती सिंग म्हणाल्या.

“आताही त्यांनी केलेल्या आरोपांमध्ये कोणतंही तथ्य नाही. या आरोपांनंतर त्यांच्यावर सोशल मीडियावर येणाऱ्या कमेंटवरून आपण ते समजू शकतो. लोक स्वत: त्यांना उत्तर देत आहेत”, असंही आरती सिंग यांनी नमूद केलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

ताज्या बातम्या