Eknath Shinde Shivsena and Anandraj Ambedkar Republican Sena Made an Alliance : महाराष्ट्रात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा होऊ शकते. या निवडणुका जाहीर होण्याआधीच अनेक पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. अशातच उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे (शिंदे) प्रमुख नेते एकनाथ शिंदे यांनी मोठी राजकीय खेळी केली आहे. शिंदे यांच्या शिवसेनेने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आनंदराज आंबेडकर यांच्या रिपब्लिकन सेना या पक्षाशी युती केली आहे. एकनाथ शिंदे व आनंदराज आंबेडकर यांनी काही वेळापूर्वी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन या युतीची घोषणा केली.
दरम्यान, या युतीची बातमी पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. आनंदराज आंबेडकरांच्या पक्षाने उजव्या विचारसरणीच्या पक्षाशी युती कशी काय केली असा प्रश्न अनेकांना पडला आहे. यावर आनंदराज यांनी स्वतः खुलासा केला आहे. ते म्हणाले, “आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आंबेडकरी कार्यकर्त्याला देखील सत्तेचा लाभ हवा यासाठी आम्ही दोघांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे. आज या युतीच्या प्रसंगी मोठ्या संख्येने कार्यकर्ते इथे आले आहेत. मला खात्री आहे की या युतीमुळे महाराष्ट्राचं संपूर्ण राजकीय व सामाजिक जीवन ढवळून निघेल.”
आमचे विचार एकच : आनंदराज आंबेडकर
आनंदराज आंबेडकर म्हणाले, “आता ही युती पाहून काहीजण म्हणतील. आमचे विचार आणि त्यांचे (एकनाथ शिंदे) विचार वेगवेगळे आहेत. त्याबद्दल मी एकच सांगतो की देशातील प्रत्येक माणूस हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या राज्यघटनेवर चालतो. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या पक्षाच्या व आमच्या विचारांमध्ये काही वेगळेपणा असण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.”
“एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांनी अनेक बौद्ध भंत्तेजींना वर्षा या शासकीय निवासस्थानी आमंत्रित केलं होतं. त्यांना तिथे भोजनदान करण्यात आलं. महाराष्ट्राच्या इतिहासात हे पहिल्यांदाच घडलं. तेव्हापासून आम्हाला वाटत होतं की एकनाथ शिंदे यांच्याबरोबर गेलो तर एक वेगळा चमत्कार होईल. दिनदुबळ्यांसाठी, गोगरिबांसाठी, शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या योजना त्यांनी आणल्या. महिला वर्गासाठी लाडकी बहीण योजनेसारखा उपक्रम राबवला जातोय.”
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
“आंबेडकरी कार्यकर्त्याला सत्तेत सामावून घेण्याचा एकनाथ शिंदेंचा शब्द”
रिपल्बिकन सेनेचे प्रमुख म्हणाले, “कुठलीही अट न ठेवता आम्ही या युतीसाठी सरसावलो, कुठलीही अडी न ठेवता त्यांनी देखील पुढे जायचं ठरवलं. आंबेडकरी कार्यकर्त्याला सत्तेत सामावून घेण्याचा शब्द एकनाथ शिंदे यांनी आम्हाला दिला आहे. त्यामुळेच ही युती होत आहे.”