शिवसेना भाजपा युती २५ वर्षांनंतर २०१४ मध्ये तुटली. दोन्ही पक्षांनी वेगवगेळ्या निवडणुका लढवल्या. मात्र, निकाल लागल्यानंतर हे दोन्ही पक्ष एकत्र आले आणि सत्ता स्थापन केली. २०१९ मध्ये यापेक्षा अगदी उलट घडले. दोन्ही पक्षांनी एकत्रित निवडणुका लढवल्या, मात्र निकाल लागल्यानंतर मुख्यमंत्री पदावरून झालेल्या वादामुळे दोघांनीही युतीतून काढता पाय घेतला. परिणामी राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले. परंतु, २०१९ साली युती कोणी तोडली हा प्रश्न सातत्याने चर्चेत येत राहतो. मोदींनी काही दिवसांपूर्वी युती तोडण्याचं खापर उद्धव ठाकरेंवर फोडलं होतं. तर, आज संजय राऊतांनी युती तोडण्यामागे भाजपाचा हात होता असं म्हटलं आहे. यावरून शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. आज माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

हेही वाचा >> “एकनाथ शिंदेंचं मुख्यमंत्रीपद हेच युती तुटण्याचं कारण”, संजय राऊतांचा मोठा दावा!

“एकनाथ शिंदे २०१९ सालीच मुख्यमंत्री झाले असते. उद्धव ठाकरे त्यांनाच मुख्यमंत्री करणार होते. पण भाजपानं त्यांना मुख्यमंत्रीपद द्यायला नकार दिला”, असं आज संजय राऊत म्हणाले. त्यावर संजय शिरसाट यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. संजय शिरसाट म्हणाले की, “२०१९ ला निवडणुका झाल्या तेव्हा आम्हाला सर्वांना मातोश्री येथे बोलावले होते. आम्ही सर्व आमदार तिथे होते. विषय हा निघाला होता की पहिलं मुख्यमंत्रीपद कोणाला? निवडणूक प्रचारातील भाषणं पाहिली की देवेंद्र फडणवीस उद्धव ठाकरेंच्या समोरच पुढच्या मुख्यमंत्रीपदाबाबत बोलले आहेत. तरीही उद्धव ठाकरेंनी पहिलं मुख्यमंत्री पद आम्हाला द्या, हवंतर मंत्रालयाच्या आवारात बोर्डवर कालावधी किती असेल हे लिहूया, असा प्रस्ताव ठेवला होता.”

“गुलाबराव पाटील, एकनाथ शिंदे, सुभाष देसाई हे सर्वजण एकमेकांच्या संपर्कात होते. फडणवीस स्वतः त्यांच्यावर नियंत्रण ठेवत होते आणि सांगत होते की असं करू नका. परंतु, मातोश्रीवरून निरोप गेला की आम्ही साडेपाच वाजता सांगतो, सहा वाजता सांगतो, सात वाजता सांगतो. हे घडत गेलं आणि नंतर फोन घेणं बंद झालं तेव्हा युती तुटल्याचं चित्र स्पष्ट झालं”, असं संजय शिरसाट म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.