“त्र्यंबकेश्वरमध्ये गावजेवणात विशिष्ट जातीचे लोक व त्यांच्या कुटुंबियांची एक वेगळी पंगत करण्यात आली. तसेच इतर बहुजनांसाठी वेगळी पंगत करण्यात आली. ही पद्धत माणसामाणसात भेदभाव करणारी असून सामाजिक विषमतेला खतपाणी घालणारी आहे. त्यामुळे ही पद्धत बंद करावी,” अशी मागणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केली आहे. याबाबत अंनिसने त्र्यंबकेश्वरचे तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांना निवेदन देत मागणी केली.

अंनिसने आपल्या निवेदनात म्हटले, “अनेक वर्षांच्या परंपरेनुसार त्र्यंबकेश्वर येथील महादेवी ट्रस्टतर्फे दरवर्षी प्रयोजन म्हणजे गाव जेवण आयोजित केले जाते. दरवर्षी चैत्र किंवा वैशाख महिन्यात ग्रामदेवतांची काही धार्मिक कर्मकांडे केल्यावर ही जेवणावळ आयोजित केली जाते. त्यासाठी संपूर्ण गावातून लोक वर्गणी आणि वस्तू रुपात खाद्यसामग्री गोळा केली जाते. गावजेवण असल्याने त्र्यंबकेश्वर गावातील सर्वच सामाजिक स्तरातील जवळपास सर्वच लोक इथे जेवणासाठी येतात.”

“त्र्यंबकेश्वरमध्ये एका विशिष्ट जातीची वेगळी पंगत”

“यावेळी गावोत्सवात एका विशिष्ट जातीचे लोक आणि त्यांचे कुटुंबीय यांच्यासाठी स्वतंत्रपणे अन्न शिजवले जाते. तसेच त्यांची जेवणाची पंगतही इतर बहुजन समाज घटकांपासून वेगळी बसते. महादेवी ट्रस् कडून सार्वजनिक भोजनाच्या ठिकाणी असा संतापजनक व मानवतेला कलंक असणारा जातीभेदाचा प्रकार राजरोसपणे येथे वर्षांनुवर्षे घडतो, असे तेथील काही स्थानिक लोकांनी महाराष्ट्र अंनिसच्या लक्षात आणून दिले,” अशी माहिती निवेदनात देण्यात आली आहे.

“ट्रस्टकडून असा जातीभेद व पंगतीभेद होत असेल, तर…”

अंनिसने पुढे म्हटलं, “जर संबंधित महादेवी ट्रस्टकडून असा जातीभेद व पंगतीभेद होत असेल, तर ही घटना या देशाच्या राज्यघटनेचे उल्लंघन करणारी तर आहेच, शिवाय १२ ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग मानले गेलेल्या त्र्यंबकेश्वर गावाला श्रद्धेपोटी येणाऱ्या भाविकांच्या श्रद्धेशी केलेली ती गंभीर प्रतारणा आहे. रविवारी (२३ एप्रिल) या महादेवी ट्रस्टकडून गावजेवणाचा कार्यक्रम होणार आहे.”

“विषमतेला व जातीभेदाला खतपाणी घालणाऱ्यांवर कारवाई करा”

“जर सर्व गावाकडून लोक वर्गणी जमा करून गावजेवण दिले जात असेल, तर तेथे कोणत्याही प्रकारचा भेदाभेद न करता सर्वांसाठी एकाच वेळी अन्न शिजवले जाईल आणि सर्व गावकरी एकाच पंक्तीत बसून जेवण करतील, असे आपण आजच संबंधितांना बोलावून लेखी पत्राद्वारे समज द्यावी. जर त्र्यंबकेश्वर येथील महादेवी ट्रस्टने धार्मिक प्रथा-परंपरेच्या नावाने हा सामाजिक विषमतेला व जातीभेदाला खतपाणी घालणारा अनिष्ट, अमानवीय आणि राज्यघटनेचे उल्लंघन करणारा प्रकार चालूच ठेवण्याचा अट्टाहास केला, आग्रह धरला, तर संबंधितांवर आपण कायदेशीर कारवाई करावी,” अशी मागणी अंनिसने त्र्यंबकेश्वर तहसिलदारांकडे केली.

हेही वाचा : “आवडत्या व्यक्तीला आकर्षित करणे, प्रजनन क्षमता वाढवणे आणि…”, ‘पॉवर ऑफ मंत्रा’च्या दाव्यांना अंनिसचे आव्हान, म्हणाले…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“माणसामाणसात भेद करणारे प्रकार कायमस्वरूपी बंद करा”

“शिवाय धार्मिक विधी, कर्मकांडाच्या नावाने आपल्या त्र्यंबकेश्वर तालुका कार्यक्षेत्रात अन्य ठिकाणीही असे माणसामाणसात भेद करणारे आणि घटनाबाह्य प्रकार चालू असतील, तर ते कायमस्वरूपी बंद करावेत,” अशी मागणी अंनिसने केली. राज्य प्रधान सचिव, डॉ. ठकसेन गोराणे, राज्य कार्यवाह कृष्णा चांदगुडे,प्रा डॉ. सुदेश घोडेराव, ॲड समीर शिंदे, कार्याध्यक्ष त्र्यंबकेश्वर संजय हराळे, प्रधान सचिव, त्र्यंबकेश्वर दिलीप काळे यांनी हे निवेदन प्रशासनाकडे दिले.