इगतपुरी तालुक्यात एकात्मिक बाल विकास प्रकल्प विभागाकडून निवड झालेल्या पात्र अंगणवाडी सेविका व मदतनीसांना १५ दिवसांत नियुक्तीपत्रे देण्याचे तसेच इतर जागांसाठी नव्याने भरती करण्याचे लेखी आश्वासन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडून देण्यात आल्याने संबंधित महिलांनी जिल्हा परिषद कार्यालयासमोर सुरू केलेले उपोषण मागे घेतले. याप्रश्नी मनसेचे आ. वसंत गिते यांनी मध्यस्थी केली.
एकात्मिक बाल विकास प्रकल्पाच्या वतीने अंगणवाडी सेविका, मदतनीस पदांसाठी नियमाप्रमाणे निवड करण्यात आली. निवड समिती अध्यक्षांच्या मार्गदर्शनाखाली निवड प्रक्रिया पारदर्शकपणे झाली असताना राष्ट्रवादीच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या दडपणामुळे पात्र उमेदवारांनाही नियुक्ती पत्रे देण्यात आली नाहीत. त्रिस्तरीय सदस्य समितीने दिलेल्या अहवालामुळे प्रशासनाने कोणताही लेखी खुलासा न मागविता शासनाची पूर्व परवानगी न घेता निवड प्रक्रिया रद्द केली. यामुळे पात्र उमेदवारांनी जिल्हा परिषदेसमोर न्यायासाठी सोमवारपासून उपोषण सुरू केले. या उपोषणकर्त्यांची मंगळवारी मनसेचे आ. वसंत गिते यांनी भेट घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रणजीतकुमार झा आणि विभागीय आयुक्त रवींद्र जाधव यांच्याशीही चर्चा केली. झा यांनी पात्र उमेदवारांना १५ दिवसांत नियुक्तीपत्र देण्याचे तसेच इतर जागांसाठी नव्याने भरती घेण्यात येईल, असे लेखी आश्वासन दिले. त्यांच्या या लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.