​सावंतवाडी : ​मालवणच्या समुद्रात परप्रांतीय ट्रॉलर्सनी पुन्हा एकदा घुसखोरी केल्याने स्थानिक मच्छिमारांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. मासेमारीचा नवा हंगाम सुरू होऊन महिनाही झालेला नाही, तोच मालवणच्या समुद्रात सुमारे अडीचशे ते तीनशे ट्रॉलर्सनी दहा वावाच्या आत घुसून माशांची मोठ्या प्रमाणावर लूटमार सुरू केली आहे. यामुळे स्थानिक मच्छिमारांच्या उदरनिर्वाहावर गंभीर परिणाम होत आहे.

​१ ऑगस्टपासून मासेमारी बंदीचा कालावधी संपून नवीन हंगाम सुरू झाला आहे. मात्र, वादळी हवामानामुळे मासेमारी अद्याप पूर्ण क्षमतेने सुरू झालेली नाही. याच संधीचा फायदा घेत, मलपीमधील शेकडो ट्रॉलर्सनी किनारपट्टीच्या जवळ म्हणजेच दहा वावाच्या आतमध्ये घुसखोरी केली आहे. नियमानुसार, या भागात केवळ पारंपरिक पद्धतीने मासेमारी करणाऱ्या लहान बोटींनाच परवानगी असते. परंतु, या नियमांचे उल्लंघन करत हे मोठे ट्रॉलर्स मोठ्या प्रमाणात मासेमारी करत आहेत. त्यामुळे स्थानिक मच्छिमारांच्या रोजगारावर आणि समुद्रातील मत्स्यसंपदेवर वाईट परिणाम होत आहे.

​मच्छिमार नेत्यांचा इशारा:

​या घुसखोरीबद्दल मच्छिमार नेते बाबी जोगी यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, जर सरकार परप्रांतीय ट्रॉलर्सची घुसखोरी थांबवू शकत नसेल, तर आता आम्हालाच समुद्रात उतरून संघर्ष करावा लागेल. त्यांच्या म्हणण्यानुसार, आपल्या डोळ्यांसमोर ही मासळीची लूट सहन करणे शक्य नाही. मत्स्य व्यवसाय खात्याकडे परप्रांतीय ट्रॉलर्सना रोखण्यासाठी अद्यापही अत्याधुनिक गस्ती नौका उपलब्ध नाहीत, त्यामुळे कारवाई प्रभावीपणे होत नाही.

​गेली अनेक वर्षे स्थानिक मच्छिमार आणि परप्रांतीय ट्रॉलर्स यांच्यात हा संघर्ष सुरूच आहे. या विषयावर अनेकदा उपोषणे आणि आंदोलने झाली, पण कारवाई नेहमीच तोकडी राहिली. गेल्या काही काळात मंत्री नितेश राणे यांच्या पुढाकारानंतर परप्रांतीय ट्रॉलर्सवर कठोर कारवाईसाठी कायदे करण्यात आले होते आणि ड्रोनच्या मदतीने काही अनधिकृत ट्रॉलर्स पकडून त्यांच्यावर दंडात्मक कारवाईही झाली होती.

त्यामुळे ही घुसखोरी थांबेल अशी आशा मच्छिमारांना होती, पण आता पुन्हा तीच परिस्थिती निर्माण झाल्याने मच्छिमारांचा संयम संपत आहे. ​या घुसखोरीची माहिती स्थानिक मच्छिमारांनी सहायक मत्स्यव्यवसाय आयुक्त सागर कुवेसकर यांना दिली असून, त्यांनी योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. मात्र, या केवळ आश्वासनांवर आता मच्छिमारांचा विश्वास बसत नाहीये.