महायुतीत सहभागी असणारे प्रहार संघटनेचे अध्यक्ष, आमदार बच्चू कडू यांनी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना थेट आव्हान दिलं होतं. बावनकुळे यांचे १० खासदार जरी आले, तरी माझा पराभव करू शकणार नाहीत, असं विधान बच्चू कडू यांनी केलं होतं. याला खासदार अनिल बोंडे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. बच्चू कडू काय म्हणाले? "एकीकडे भाजपा आमच्याबरोबर सत्तेत या असं सांगते. दुसरीकडे स्थानिक ठिकाणी त्यांचे लोक आमची अडवणूक करतात. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सुद्धा अनिल बोंडे यांना बच्चू कडू कडे लक्ष ठेवा. आपल्याला त्याचा पराभव करायचा आहे, असं सांगितलं. बावनकुळेंना सांगू इच्छितो, तुमचे १० खासदार आले, तरी ते माझा पराभव करू शकणार नाहीत," असं बच्चू कडूंनी म्हटलं होतं. हेही वाचा : भाजपच्या कुरघोडीमुळे आमदार बच्चू कडू अस्वस्थ! "…हा अहंकार असू नये" यावर अनिल बोंडेंनी म्हटलं, "बावनकुळेंनी अचलपूरमध्ये आल्यावर भाजपाचं संघटन वाढवण्याच्या सूचना दिल्या होत्या. कुणाला पाडा, असं सांगितलं नव्हतं. पण, मला कुणीच पाडूच शकत नाही, हा अहंकार असू नये. हा जनतेचा अपमान आहे. ज्या जनतेनं बच्चू कडू यांना निवडून दिलं, त्या जनतेला गृहित धरलं जात असेल, तर अहंकार खूप दिवस टिकतो, असं वाटत नाही," असा हल्लाबोल अनिल बोंडेंनी बच्चू कडूंवर केला आहे. "भाजपाकडून खच्चीकरण करण्याचं काम" दरम्यान, बच्चू कडू यांनी पुन्हा आज ( ५ ऑक्टोबर ) भाजपाला लक्ष्य केलं आहे. बच्चू कडू म्हणाले, "भाजपाकडून जाणीवपूर्वक खच्चीकरण करण्याचं काम केलं जात आहे. चंद्रशेखर बावनकुळेंनी अचलपूर मतदारसंघात अनिल बोंडे यांना लक्ष घालण्यास सांगितलं. पण, बोलून कुणी लक्ष घालत नाही. एकीकडं सांगायचं सरकारमध्ये सामील व्हा. सामील झाल्यानंतर अशा प्रकारची भूमिका घ्यायची. हे कुणासाठीही चांगलं नाही." हेही वाचा : अधिष्ठातांना शौचालय साफ करायला लावणं भोवलं, अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल होताच हेमंत पाटील म्हणाले… "भाजपा मित्र पक्ष म्हणून जवळ घेतो, नंतर…" "ज्यांच्याबरोबर आहोत, त्यांच्याशी प्रामाणिक राहणं महत्वाचं आहे. यामुळे पक्षाची प्रतिमा मलिन होईल. बावनकुळे स्पष्ट बोलले, 'काहीही करून कसं पाडायचं, कोणत्या पद्धतीनं जायचं.' मला वाटतं, भाजपा मित्र पक्ष म्हणून जवळ घेतो. नंतर अफजल खानासारखी मिठी मारतो. हे चांगलं नाही," असं बच्चू कडूंनी म्हटलं.