वसुलीच्या आरोपामुळे ईडी कारवाईला सामोरे जावे लागलेले माजी गृहमंत्री अनिल देशमुख आज दीर्घकाळानंतर सक्तवसुली संचलनालय अर्थात ईडी कार्यालयात दाखल झाले. दरम्यान, अनिल देशमुख यांनी केवळ चौकशी होणार की त्यांना अटक केली जाणार? याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे. दरम्यान, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी देशमुखांवर जोरदार निशाणा साधला आहे.

या बद्दल पुण्यात माध्यमांशी बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, अनिल देशमुख आता प्रकट झाले आहेत. ते आधी का आले नाहीत? आता ईडी ठरवेल काय कारवाई करायची. आता जर ते ईडीसमोर आले नसते तर त्यांना फरार घोषित करण्यात आलं असतं. ते टाळण्यासाठीच ते आज ईडी कार्यालयात दाखल झाले आहेत. अटक टाळण्यासाठी त्यांनी सगळे प्रयत्न केले. मात्र, त्यांना शरण जाण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता.

हेही वाचा – अनेक दिवस बेपत्ता राहिल्यानंतर अनिल देशमुख ईडी कार्यालयात, पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले…

दरम्यान, अनिल देशमुख यांनी आज एक ट्विट करुन आपण ईडी कार्यालयात चौकशीसाठी जात असल्याचं ट्वीट दुपारी साडे बाराच्या सुमारास केलं होतं. ‘माननीय उच्च न्यायालयाने माझ्या संविधानातील अधिकारात मला विशेष कोर्टात जाण्याचे स्वातंत्र दिले असतानाही मी आज ईडीच्या कार्यालयात जाऊन चौकशीसाठी संपूर्ण सहकार्य करणार आहे’, असं देशमुख आपल्या ट्विटमध्ये म्हणाले.

अनिल देशमुख यांनी व्हिडीओ ट्वीट करत आपली बाजू मांडली आहे. या व्हिडीओत ते म्हणाले, “नमस्कार मी अनिल देशमुख बोलतोय. मला जेव्हा ईडीचा समन्स आला तेव्हा मी ईडीला सहकार्य करत नाही अशा चुकीच्या बातम्या प्रसारमाध्यमांमध्ये आल्या. मी तुम्हाला सांगू इच्छितो की जेव्हा जेव्हा मला ईडीचा समन्स आला तेव्हा तेव्हा मी त्यांना कळवलं की माझी याचिका उच्च न्यायालयात आहे. त्याची सुनावणी चालू आहे. मी सर्वोच्च न्यायालयातही याचिका दाखल केलीय. त्याचा निकाल आल्यानंतर मी स्वतः ईडीच्या ऑफिसमध्ये येईन.”