वन्यप्राण्यांच्या कातडीची तस्करी करताना पोलिसांनी एकास कारसह ताब्यात घेतले. त्याच्याकडून ससा व हरणाची कातडी, हाडे व शिंगे तसेच वन्यप्राण्यांचे काही अवयव जप्त करण्यात आले आहे. धुळे तालुक्यातील चौगाव चौफुलीवर पोलिसांनी सापळा रचून संशयित कारची तपासणी केली असता हे प्रकरण उघडकीस आले. धुळे तालुक्यातील काही भागांमधून वन्यप्राण्यांची शिकार करून त्यांच्या अवयवांची तस्करी होत असल्याची गुप्त माहिती पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह यांना मिळाली होती. या गुप्त माहितीची खात्री करण्यासाठी पोलिसांनी चौगाव चौफुलीवर सापळा रचला होता. कारचालक पुरोहित हरिकिसन राणे (रा. पिंपरी-चिंचवड, पुणे) याच्याकडे चौकशी केली असता तो गोंधळून गेला. यामुळे पोलिसांचा संशय बळावला.  कारमधील बॅगची तपासणी केल्यावर हरणाचे कातडे, हाडे व शिंगे आढळून आले. या वेळी सशाचे कातडेही मिळाल्याची प्राथमिक माहिती आहे. पोलिसांनी वन्यप्राण्याची तस्करी करणारी टोळी सक्रिय असल्याबाबत संशय व्यक्त केला आहे. या प्रकरणी धुळे तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.