Anjali Damania vs Ajit Pawar on Shatabdi hospital : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार हे अमेडिया या त्यांच्या कंपनीच्या माध्यमातून पुण्यातील मुंढवा येथील ४० एकर जमीन खरेदी करत असतानाच हे प्रकरण प्रसिद्धीझोतात आलं. यानंतर या प्रकरणातील कथित घोटाळा पुढे आला आणि पार्थ पवारांना हा व्यवहार थांबवावा लागला. मात्र, या व्यवहारावरून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी अजित पवारांवर सडकून टीका केली होती. तसेच त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. आता पुन्हा एकदा दमानिया यांनी अजित पवारांवर आरोप केले आहेत.
मुंबई महापालिकेच्या गोवंडीमधील शताब्दी रुग्णालयावरून दमानिया यांनी अजित पवारांवर निशाणा साधला आहे. मुंबई महानगरपालिकेने ५०० कोटी रुपये खर्च करून बांधलेलं शताब्दी रुग्णालय पीपीपी (पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप) या तत्वानुसार चालवण्यासाठी तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टने रस दाखवला असल्याची एक बातमी नुकतीच टाइम्स ऑफ इंडियाने प्रसिद्ध केली होती. ही बातमी एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर शेअर करत अंजली दमानिया यांनी अजित पवारांवर टीका केली आहे. “आता आणखी एक ५०० कोटींचं हॉस्पिटल अजित पवारांच्या नातेवाईकांना?” अशी पोस्ट त्यांनी केली आहे.
शताब्दी रुग्णालय अजित पवारांच्या पुतण्याकडे सोपवलं जाणार?
शताब्दी रुग्णालय हे पीपीपी तत्वानुसार चालवण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने निविदा मागवल्या होत्या. त्यासाठी तीन निविदा आल्या होत्या. त्यापैकी एक निविदा ही तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्र्स्टची होती. ही ट्रस्ट पद्मसिंह पाटील यांची असून ते अजित पवारांच्या पत्नी खासदार सुनेत्रा पवार यांचे सावत्र बंधू आहेत. तर, पद्मसिंह पाटलांचे पुत्र तथा अजित पवारांचे पुतणे राणा जगजीतसिंह पाटील हे या ट्रस्टचा कारभार पाहतात. राणा पाटील हे भारतीय जनता पार्टीचे नेते असून ते तुळजापूरचे आमदारही आहेत. यावरून अंजली दमानिया यांनी म्हटलं आहे की “राज्यातील आणखी एक रुग्णालय अजित पवारांच्या नातेवाईकांना दिलं जाणार आहे.”
अंजली दमानियांचा अजित पवार व देवेंद्र फडणवीसांवर संताप
अंजली दमानिया यांनी एक्सवर यासंदर्भात केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की “आता आणखी एक ५०० कोटी रुपयांचं हॉस्पिटल अजित पवारांच्या नातेवाईकांना? शताब्दी हॉस्पिटल हे एक ५८० बेडचे हॉस्पिटल आहे, जे बृहन्मुंबई महानगरपालिकेनं बांधलं आहे. विरोध असताना देखील हे रुग्णालय पीपीपी तत्वाने देण्याचा घाट घातला आणि योगायोगाने यात पद्मसिंह पाटील यांच्या तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टने बोली लावली आहे. याच रुग्णालयाच्या जवळ राष्ट्रीय स्वयंसेवक संघ एक रुग्णालय बांधत आहे आणि हे तयार रुग्णालय अजित पवारांच्या नातेवाईकांना बहाल केलं जात आहे. मुख्यमंत्री फडणवीसची, तुम्ही एक काम करा, एकदाचा अख्खा महाराष्ट्र या सगळ्या राजकारण्यांच्या घशात घालून मोकळे व्हा.”
