ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पुण्यातील रुबी रुग्णालयात त्यांना दाखल केलं असून रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. आज दुपारी अण्णा हजारे यांच्या छातीत अचानक दुखू लागल्यामुळे त्यांना तातडीने रुबी रुग्णालयात दाखल केलं. अण्णा हजारेंवर अँजिओप्लास्टी झाली असून सध्या त्यांना आराम करण्याचा सल्ला देण्यात आल्याचं समजतंय. अण्णा हजारेंना रुग्णालयात दाखल केल्यामुळे त्यांच्या अनुयायांमध्ये चिंतेचं वातावरण असून त्यांच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी, यासाठी रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचारी प्रयत्न करत आहेत.

अण्णा हजारेंची प्रकृती स्थिर

रुबी रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अवधूत बोदमवाड यांनी अण्णांच्या प्रकृतीविषयी माहिती दिली आहे. “छातीत दुखत असल्याची तक्रार अण्णांनी केल्यानंतर त्यांना रुबी रुग्णालयात आणण्यात आलं. त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू करण्यात आले. सध्या त्यांना निरीक्षणाखाली ठेवण्यात आले असून त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे”, अशी माहिती डॉ. बोदमवाड यांनी दिली आहे.

मुख्यमंत्र्यांनी केली प्रकृतीची चौकशी

अण्णा हजारे यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे समजल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली. तसेच अण्णा हजारे लवकर बरे व्हावेत अशी सदिच्छा व्यक्त केली. मुख्यमंत्री सध्या एच. एन. रिलायन्स रुग्णालयात दाखल असून त्यांच्यावर फिजिओथेरपी सुरू आहे. मात्र आज अण्णा हजारे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे कळल्यावर त्यांनी अण्णांच्या प्रकृतीला आराम मिळावा अशी भावना व्यक्त केली असल्याचं मुख्यमंत्री कार्यालयाकडून सांगण्यात आलं आहे.