अहिल्यानगर : जिल्हा माध्यमिक शिक्षक सोसायटीच्या वार्षिक सभेत दरवर्षी गोंधळ होत असतो. यंदा मात्र सभा शांततेत पार पडली. विरोधकांच्या बहिष्कारमुळे गोंधळाची परंपरा खंडित झाली. त्यामुळे संस्थेची वार्षिक सभा म्हणजे केवळ सत्ताधाऱ्यांचा मेळावा ठरला.
जिल्हा माध्यमिक शिक्षक सोसायटीची बँक सभा आज, रविवारी संस्थेचे अध्यक्ष अप्पासाहेब शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. सभासदांचा लाभांश ९ टक्क्यांऐवजी ६ टक्के झाल्याच्या नाराजीतून सत्ताधारी व विरोधी मंडळात गेल्या काही दिवसांपासून समाज माध्यमात आरोप-प्रत्यारोप सुरू होते. परंतु विरोधी मंडळाच्या अनुपस्थितीमुळे सभेत फारशी चर्चा झाली नाही.
सभेत उत्तम जिंदगी योजनेतील तरतूद, कृतज्ञता निधी, संस्थेचे नामकरण शिक्षक व शिक्षकेतर सोसायटी करणे, कर्ज मर्यादा वाढ आदी विषयांवर चर्चा झाली. अध्यक्ष शिंदे यांनी सभासदांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. संस्थेचे उपाध्यक्ष अर्जुन वाळके, सचिव स्वप्निल इथापे, संचालक बाबासाहेब बोडके, महेंद्र हिंगे, सुनील दानवे, राजेंद्र कोतकर, सुधीर कानवडे, अप्पासाहेब जगताप, सुरज घाटविसावे आदी उपस्थित होते.
तीस वर्षांनंतर भाऊसाहेब कचरे अनुपस्थित
सोसायटीवर पुरोगामी मंडळाचे नेते भाऊसाहेब कचरे यांचे गेले २५ वर्षांपासून एकहाती वर्चस्व होते. वार्षिक सभेत अध्यक्ष इतर कोणीही असले तरी सभासदांच्या प्रश्नांना कचरे हेच उत्तर देत असत. मात्र ३० वर्षांनंतर प्रथमच कचरे यांच्या अनुपस्थितीत सभा झाली. तीन महिन्यांपूर्वी झालेल्या निवडणुकीत कचरे यांच्या पुरोगामी मंडळाचे पानिपत झाले.
ठेवी वाढवा अभियान राबवणार
यावेळी बोलताना अध्यक्ष अप्पासाहेब शिंदे यांनी सांगितले, संस्थेचा कारभार काटकसरीने करण्याला प्राधान्य राहील. ठेवी कमी झाल्याने ठेवी वाढवा अभियान राबवणार आहे. उत्तम जिंदगी योजनेतील नफ्यातील पैशांची तरतूद करणे बंधनकारक होते, त्यामुळे लाभांश कमी मिळाला. पुढील वर्षी जामीन कर्जाची मर्यादा वाढवण्यात येईल.
नफा मुद्दाम कमी दाखवला
सत्ताधाऱ्यांनी लाभांश वाढीची शिफारस सभेत मांडली नाही, लाभांश वाढून मिळणार नसल्याने पुरोगामी मंडळाने एकमताने सभेवर बहिष्कार टाकला. अपेक्षित नफा होऊनही मागील संचालकांना दोष जाईल म्हणून मुद्दाम उत्पन्नातून अवास्तव तरतुदी करून नफा कमी दाखवला गेला अशी टीका पुरोगामी मंडळाचे अध्यक्ष उत्तमराव खुळे यांनी केली.