नवी दिल्ली येथे २३ फेब्रुवारीपासून ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आंदोलन सुरू करणार असल्याने त्यांना पाठिंबा देण्यासाठी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवारी भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलन न्यासच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.
केंद्रात नवीन सरकार सत्तेत आल्यानंतर शेतकऱ्यांच्या हिताचे कायदे होतील अशी अपेक्षा होती, मात्र केंद्र सरकारने भूमी अधिग्रहणासंदर्भात काढलेला वटहुकूम शेतकरीविरोधी असल्याचे न्यासने नमूद केले आहे. २०१३च्या भूमी अधिग्रहण कायद्यात गावातील जमीन अधिग्रहित करताना ७० टक्के शेतकऱ्यांची संमती असेल तरच सरकारला जमीन घेता येईल, अशी तरतूद होती. परंतु सरकारने वटहुकूम काढून ती तरतूद काढून टाकली. तसेच सक्षम जनलोकपालही सरकार अस्तित्वात आणत नाही. काळा पैसा भारतात परत आणण्यासाठीही कारवाई होताना दिसत नाही. याविरोधात अण्णा हजारे यांना पाठिंबा देण्यासाठी येथे सकाळी १०.३० पासून न्यासच्या वतीने आंदोलन करण्यात येणार आहे. जिल्ह्य़ातील सर्वानी आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन न्यासचे पदाधिकारी हेमंत कवडे, राजेंद्र नानकर, बाळासाहेब शिंदे आदींनी केले आहे.