राहाता : एका वर्षात पैसे दुप्पट करण्याचे आमिष दाखवून शिर्डीसह जिल्ह्यातील गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या कंपनीच्या विरोधात संघटित गुन्हेगारीनुसार मोक्का अन्वये कारवाई करावी व आरोपींकडून पैसे हस्तगत करण्यासाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचे डॉ. राजेंद्र पिपाडा यांनी सांगितले.
प्रसिद्धिपत्रकात डॉ. पिपाडा यांनी म्हटले की, व्हाॅट्सअपवर गुंतवणूकदारांचा गट तयार करून आरोपींनी डिसेंबरमध्ये शिर्डीतील हॉटेलमध्ये गुंतवणूकदारांची बैठक घेतली. तेथे मोठे आमिष दाखवून गुंतवणुकीची रक्कम जमा करण्यात आली. नंतर ग्रुप चालक संपर्काबाहेर गेला.
त्याच्या सहकाऱ्यांनी गुन्हे दाखल झाले तर पैसे मिळणार नाहीत, अशी भावनावशता निर्माण करून जूनपर्यंत गुंतवणूकदारांना काही करू दिले नाही व गुंतवणूकदारांच्या रकमेची विल्हेवाट लावली. यासंदर्भात राहता पोलिसांनी संबंधित गुंतवणूक कंपनीच्या चालकांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. गुंतवणूकदारांनी आरोपींच्या विरोधात पोलिसांकडे तक्रारी दाखल कराव्यात तरच गुंतवलेली रक्कम परत मिळू शकते, असे आवाहन डॉ. पिपाडा यांनी केले.