रत्नागिरी : हालअपेष्टा सहन करत आई-वडिलांनी या नगरपालिकेची सेवा केली. सफाई कामगार म्हणून या जनतेची सेवा केली. जनतेला रोगराई होऊ नये, स्वच्छता ठेवण्याचे काम त्यांनी केलं. त्यांच्या कष्टामुळे, त्यांच्या पुण्याईमुळे आज नोकरीचे पत्र मिळाले असल्याची जाणीव ठेवा. त्यांचा आदर्श घेऊन भविष्यामध्ये आपण सगळ्यांनी मिळून काम करावे, असे प्रतिपादन पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी केले.
रत्नागिरी नगरपरिषदेच्या सभागृहात लाड-पागे समितीच्या शिफारशीनुसार नगरपरिषदेच्या २० सफाई कामगारांना कायम नियुक्तीपत्राचे पालकमंत्री डॉ. सामंत यांच्या हस्ते शनिवारी वितरण करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मुख्याधिकारी वैभव गारवे, बंड्या साळवी, राहूल पंडित, बिपीन बंदरकर, विजय खेडेकर, स्मिता पावसकर आदी उपस्थित होते.
पालकमंत्री डॉ. सामंत म्हणाले की, तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी धोरणात्मक निर्णय घेतला, जो सफाई कामगार म्हणून काम करतो, तो कुठल्याही जाती धर्माचा जरी असला तरी शहर साफ करण्याचं काम करतो. शहराची स्वच्छता ठेवतो. रोगराई होणार नाही याची दक्षता घेतो, अशा सफाई कामगारांच्या मुलांना नोकरी मिळाली पाहिजे. हा ऐतिहासिक निर्णय त्यांनी घेतला.
आधुनिक तंत्रज्ञान वापरून, सफाई कामगारांना बरोबर घेऊन आधुनिक प्रणाली प्रत्येक शहरांमध्ये आणली गेली पाहिजे. आधुनिक प्रणाली वापरुन स्वच्छता करण्याचा मान देखील रत्नागिरी नगरपालिकेने पहिला घ्यावा, असे ही त्यांनी सांगितले. ३६५ दिवस रत्नागिरी शहर स्वच्छ असले पाहिजे. पर्यटकांमध्ये विलक्षण अशी वाढ झालेली आहे. याचा फायदा देखील रत्नागिरी शहरातल्या लोकांना होत आहे. मुख्याधिकारी आणि नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी देखील अतिशय चांगल्या पद्धतीने शहराचे सादरीकरण जगासमोर करणं गरजेचं असल्याचे सामंत यांनी सांगितले.