माजी नगराध्यक्षांचा पाणीपट्टी वाढीला विरोध
पंढरपूर : पंढरपूर नगरपरिषदेचे सन २०२२ -२३ च्या अंदाजपत्रकास मंजुरी देण्यात आली आहे. नगरपरिषदेचे वार्षिक उत्पन्न १८३ कोटी ८१ लाख ९८ हजार ९१९ रुपये आहे. यामध्ये विविध विकासकामे, महसूल व भांडवली खर्चासाठी १८३ कोटी ७९ लाख ३ हजार १७६ रुपये खर्च होणार आहे. त्यामुळे वर्षांअखेरीस २ लाख ९५ हजार ७४३ इतके शिल्लक राहणार आहेत. या वर्षी शहरात स्टेडियम, वाहनतळ, व्यापारी संकुल आदी विकासकामे होणार आहेत. तसेच शहराच्या पाणीपट्टीमध्ये २५ टक्के वाढ करण्यात आली आहे. या पाणीपट्टी वाढीला माजी नगराध्यक्षा साधना नागेश भोसले यांनी विरोध केला आहे.
पंढरपूर नगरपरिषदेची वार्षिक अंदाजपत्रक सभा उपविभागीय अधिकारी तथा पंढरपूर नगरपरिषदेचे प्रशासक गजानन गुरव यांच्या अध्यक्षतेखाली व मुख्याधिकारी अरिवद माळी व सर्व विभाग प्रमुख यांच्या समवेत सभा झाली. या सभेमध्ये अंदाजपत्रक सादर करण्यात आले. या अंदाजपत्रकामध्ये चौदावा व पंधरावा वित्त आयोग, वैशिष्टय़पूर्ण योजना, विशेष वैशिष्टय़पूर्ण योजना, यमाई तलाव सुशोभीकरण, प्राथमिक सोयीसुविधा विकास योजना, आदी योजनांमध्ये विशेष तरतूद करण्यात आली आहे. नगरपरिषदेवर पडणारा आर्थिक बोजा कमी करण्याबाबत चर्चा होऊन नगरपरिषदेचे पाणीपुरवठा करण्याकरिता वीजबील, कच्चे पाणी बील, केमीकल या होणाऱ्या खर्चाचा विचार करिता पाणीपुरवठा योजना तोटय़ात आहे. त्यामुळे सध्याच्या पाणीपट्टी मध्ये २५ % वाढ करण्यात आली आहे. शहरात अंबाबाई पटांगण येथे स्टेडियम व इसबावी येथे पार्किंग व शॉपिंग सेंटर विकसित करण्याकरिता तरतूद हे या अर्थसंकल्पाचे ठळक वैशिष्टय़ आहे. या सभेस उपमुख्याधिकारी सुनील वाळुजकर, नगरअभियंता नेताजी पवार, पाणी पुरवठा अभियंता आत्माराम जाधव,आरोग्याधिकारी शरद वाघमारे, इतर विभाग प्रमुख उपस्थित होते.
आंदोलनाचा इशारा
पंढरपूर नगरपरिषदेने पाणीपट्टीत २५ टक्के वाढ केली आहे. गेली दोन वर्ष करोनामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. व्यापाऱ्यांना फटका बसला. गेले काही महिने हळूहळू परिस्थिती सुधारू लागत आहे. त्यात करवाढ करायला नको होती. पालिकेने पाणीपट्टी पूर्वीप्रमाणे करावी. याबाबत पालिकेला आणि जिल्हाधिकारी यांना निवेदन देणार आहे. जर वाढीव पाणीपट्टी रद्द झाली नाही तर आंदोलन करू असा इशारा माजी नगराध्यक्षा साधना नागेश भोसले यांनी दिला आहे.