रत्नागिरी : रत्नागिरी येथील पुरातत्त्व कार्यालयाला बीडीएस यंत्रणेच्या तांत्रिक कारणामुळे ६ कोटी रुपयांचा फटका बसला. तांत्रिक बिघाडामुळे पुरातत्त्व कार्यालयाला आलेला निधी राज्य शासनाकडे परत गेल्याने हा निधी परत मिळविण्यासाठी पुरातत्त्व विभागाला धावाधाव करावी लागली.रत्नागिरीच्या पुरातत्त्व कार्यालयाला संग्रहालये आणि गड किल्ल्यांच्या देखभाल कामांसाठी राज्य शासनाकडून ६ कोटी रुपये देण्यात आले होते. मात्र बिडीएस प्रणालीच्या तांत्रिक आडचणीमुळे हा निधी परत गेला. मात्र तांत्रिक गोष्टीमुळे परत गेलेला निधी पुन्हा मिळाण्यासाठी पुरातत्त्व विभागाकडून हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत. पुरातत्त्व कार्यालयाने याआधी राज्य संरक्षित असलेल्या गडकिल्ल्यांच्या दुरुस्तीसाठी १५ कोटींच्या निधीचा प्रस्ताव शासनाकडे सादर केलेला आहे.

दरवर्षाप्रमाणे यावर्षी देखील शासनाचे अर्थसंकल्पीय अनुदान वर्षांच्या अखेरच्या दिवशी विविध विभागांकडून अदा करण्यात आले. त्यात शासकीय योजना व अनुदानाचा तसेच कामांच्या देयकांचा समावेश असतो.

शासनाच्या प्रत्येक विभागाच्या बीडीएस प्रणालीद्वारे शासकीय अनुदान देण्याचे काम आर्थिक वर्षात केले जाते.याप्रमाणे पुरात्तत्त्व विभागाला देखील वस्तु संग्रहालयाच्या नवीन दालनासाठी सुमारे साडेचार कोटी रुपये आणि इतर कामांचे मिळून असे ६ कोटी रुपयांचा निधी राज्य शासनाकडून मिळणार होता. मात्र पुरातत्व विभागाची बीडीएस प्रणाली ११ वाजता बंद झाली अस्ताना ११ वाजून १० मिनिटांनी शासनाकडून निधी आला. बीडीएस यंत्रणा बंद झाल्यामुळे शासनाचा हा निधी संबंधित विभागाकडे न जाता राज्य शासनाकडे परत गेला. मात्र यामुळे बिडीएस प्रणालीचा तांत्रिक फटका पुरातत्त्व विभागाला बसल्याने निधी परत मिळविण्यासाठी या विभागाला धावाधाव करण्याची वेळ आली.