‘सैराट’ हा चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून चित्रपट रसिकांच्या गळ्यातील ताईत बनलेल्या आर्ची आणि परश्या यांचा लातूरमधील कार्यक्रम पुरेशा प्रेक्षकसंख्येअभावी रद्द करण्याची नामुष्की आयोजकांवर ओढवली आहे. लातूरच्या क्रीडा संकुलात रविवारी शाळेच्या मदत निधीसाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमामध्ये ‘सैराट’ आणि ‘चला हवा येवू द्या’मधील कलाकार सहभागी होणार होते. गेल्या काही दिवसांत राज्यभरात अनेक ठिकाणी परशा आणि आर्चीच्या कार्यक्रमाला मोठ्याप्रमाणावर गर्दी होताना दिसत होती. ते जिथे जिथे जातात तिथे तिथे त्यांना बघण्यासाठी तरुणाई बेभान होते आणि मग कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन आयोजकच अडचणीत येण्याचे प्रकार घडताना दिसत होते. त्यामुळे लातूरमधील कार्यक्रमालाही मोठी गर्दी जमेल, अशी आयोजकांची अपेक्षा होती. मात्र, कार्यक्रम अवघ्या एका दिवसावर येऊन ठेपला तरी तिकीट विक्रीला पुरेसा प्रतिसाद न मिळाल्याने हा कार्यक्रम रद्द करत असल्याचे आयोजकांनी सांगितले. मात्र, या कार्यक्रमाला छुपा विरोध असल्यामुळे कायदा-सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी हा निर्णय घेतल्याचीही चर्चा रंगली आहे. सुरूवातीला क्रीडा संकुलावरच्या मैदानावर खड्डे पडल्यामुळे या कार्यक्रमाला विरोध करण्यात आला होता. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी कायदा आणि सुव्यवस्थेच्या मुद्दयावरून कार्यक्रम रद्द केला असल्याची माहिती समजते आहे.
यापूर्वी शक्तिप्रदर्शनाच्या हेतूने घेण्यात येणाऱ्या सार्वजनिक कार्यक्रमांना  गर्दी जमविण्यासाठी राजकीय पक्षांनी सध्या ‘सैराट’ चित्रपटातील अभिनेत्री रिंकू राजगुरू हिच्या लोकप्रियतेचा खुबीने वापर करण्यास सुरुवात केली होती. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या तोंडावर आलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तरुणाईला वेड लावणाऱ्या चित्रपटातील या ‘आर्ची’ला राज्यभरातून कार्यक्रमांसाठी आवताण येत आहेत.  राजकीय कार्यक्रमांसाठी भरमसाठ गोष्टींवर खर्च करण्यापेक्षा या अभिनेत्रीला बोलावले, की काम होत आहे, हे नेत्यांनी हेरल्यामुळे  सध्या जागोजागी ‘आर्ची’चे दर्शन घडू लागले आहे. गेल्या काही वर्षांपासून  राजकीय कार्यक्रमांना गर्दी जमविण्यासाठी पैशाचा वापर मोठय़ा प्रमाणात करावा लागतो. पैसे खर्च करूनही गर्दी जमतेच असे नाही. यंदा त्यावर पर्याय म्हणून अनेक राजकीय नेत्यांनी ‘आर्ची’च्या लोकप्रियतेचा पद्धतशीरपणे वापर करून घेण्यास सुरुवात केली आहे. सोलापूर, उस्मानाबादपाठोपाठ सांगली जिल्ह्य़ात झालेले सर्व कार्यक्रम हे असेच राजकीय हेतूने प्रेरित होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Archi and parsha public show cancelled due to low response in latur
First published on: 15-10-2016 at 17:11 IST